नो सस्पेन्स, नो थ्रिलर ‘मर्डर – 3’

हिंदी चित्रपटांची कथा पूर्वी संपायची! आता मात्र या परंपरेत बदल झाला आहे कारण सध्या सिक्वलची बॉलिवूडमध्ये धूम सूरू आहे. यामुळे चित्रपट संपत नाही; तर नव्या कथेसाठी चा ‘प्लॉट’ तयार करण्याकडे दिग्दर्शक लक्ष देत आहेत. त्याला ‘मर्डर 3’ अपवाद नाही. ‘मर्डर’ म्हटले की मल्लीका शेरावत आणि इम्रान हाश्मी आपल्या नजरेसमोर येतात. ‘मर्डर 2’ मध्ये इम्रान होता. आता मात्र ‘मर्डर 3’ मध्ये मात्र इम्रानची जागा रणदिप हुड्डाने घेतली आहे; तर दिग्दर्शनात मुकेश भट्ट यांच्या मुलाचे पदार्पण झाले आहे.

‘मर्डर 3’ ची कथा व्यवसायाने वाईल्डलाईफ फोटोग्राफर असलेल्या विक्रम (रणदीप हुड्डा) भोवती गुंफण्यात आली आहे. विक्रम सुरुवातीच्या काळात दक्षिण आफ्रिकेत राहतो. मात्र नंतर तो मुंबईत स्थायिक होतो. विक्रमच्या प्रेयसीचे नाव रोशनी (आदिती राव हैदरी) आहे. रोशनीला विक्रमवर संशय आहे. एक दिवस ती विक्रमला मेसेज करुन आपल्या मनातील ही गोष्ट सांगून टाकते आणि त्याला सोडून निघून जाते. रोशनी अचानक सोडून निघून गेल्यामुळे विक्रम काळजीत पडतो. काहीतरी गडबड असल्याचेही त्याच्या लक्षात येते. तो पोलिसांत रोशनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवतो. रोशनी बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई विक्रमकडेच वळते. मात्र विक्रम त्याकडे लक्ष न देता रोशनीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु करतो.

गुन्हा आणि सेक्स यांचं मिश्रण आपल्याला मर्डर 3 मध्येही दिसून येतं. गुन्हा, थोडासा सस्पेन्स आणि त्याला सेक्सचा तडका… हीच भट्ट कॅम्पच्या चित्रपटांची खासियत यामध्येही कायम आहे.
रोशनीच्या अचानक गायब होण्यामुळे विक्रम थोडा डिस्टर्ब आहे, असे वाटत असतानांच तो एका वेट्रेसच्या( सारा लॉरेन) प्रेमात पडतो. दोघांवरही प्रेमाचा ताप चढायलाच लागतो की मध्येच साराला रणदीपची पूर्वप्रेमिका गायब असल्याची माहिती मिळते. त्यामुळे पोलिसही तिच्या मागे लागतात. त्यामुळे कथानक आता एका ‘मर्डर मिस्ट्री’कडे वळायला लागले असे वाटत असतानाच इंटरव्हलमध्ये कथानक दुसरे वळण घेते आणि मग प्रेक्षकांमध्ये थोडीफार उत्सुकता दिसून येते. त्यामुळे चित्रपटाचा दुसरा भाग पहिल्या भागाइतका कंटाळवाणा वाटत नाही.

या चित्रपटाचे कथानक थोडे ठीक-ठाक म्हणजे अपेक्षेपेक्षा थोडे बरे वाटते; पण चित्रपटाला मनोरंजक बनवण्याच्या नादात दिग्दर्शकाकडून काही गोष्टी कच्च्या राहिल्यात तर काही जरा जास्तच ‘पकल्यात’. बरेचसे सीन बराच काळ ताणून धरले जातात. ते पाहून प्रेक्षकांनाही पकल्यासारखेच वाटते. चित्रपटाची कथा कुठे भटकतेय हे प्रेक्षक पूर्णवेळ शोधतच राहतो. ‘सस्पेन्स थ्रीलर’ चित्रपट असा दावा करण्यात आला असला तरी त्यात ‘सस्पेन्स’ही नाही आणि ‘थ्रीलर’ही नाही.

रणदीप हुड्डाच्या अभिनयाविषयी बोलायचे झाले तर त्याने अभिनयात फारशी कमाल दाखवलेली नाही. सारा लॉरेनबद्दलही हेच बोलावे लागेल. तिचा अभिनय बघता तिला भविष्यात खूप वाव मिळेल असेही वाटत नाही. आदितीचे काम चांगले झाले आहे. प्रीतम, रॉक्सेन बँडचं संगीत हे भट्ट कॅम्पच्या सिनेमांचं वैशिष्ट्यं! या सिनेमातही संगीताने पुरेपूर साथ दिली आहे. मनोरंजनाच्या बाबतीत फार अपेक्षा न ठेवता वेळ घालवण्यासाठी जायचे असेल तरच ‘मर्डर 3’ बघावा.

निर्माता – मुकेश भट्ट, दिग्दर्शक – विशेष भट्ट, संगीत- प्रीतम, कलाकार – रणदीप हुड्डा, आदिति राव हैदरी, सारा लॉरेन

Leave a Comment