सोलापूरजवळ सापडले पुरातन अवशेष

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल गावाच्या माळरानावर केलेल्या उत्खननात रोमन साम्राज्याशी संबंधित अवशेष सापडले आहेत. सोलापूर विद्यापीठातील प्राचीन इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाच्या वतीने चाळीस दिवसापासून हे उत्खनन सुरू आहे. हे अवशेष आद्य इतिहासकालीन असल्याचा दावा विभाग प्रमुख डॉ. माया पाटील यांनी दिली.

उत्खननामध्ये हस्तिदंती दागिने, लोखंडी हत्यारे, मातीचे मणी , घोड्याची शिल्प, तांब्याचे घुंगरू, मातीची भांडी, पंचमार्क नक्षीकाम, स्फटिक, लामण दिवा, मानवी आणि प्राण्यांची हाडे, सुपारीच्या आकाराचे मातीचे मणी , घरांच्या पायाचे अवशेष, शंखांच्या बांगड्यांचे तुकडे, मासे पकडण्याचा गळ, स्त्री प्रतिमा, नक्षीदार तबक अशा वस्तू या उत्खननात सापडल्या.

हे अवशेष इसवीसन पूर्व दोनशे वर्ष ते १३ व्या शतकपर्यण्तचे असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. यापैकी खापराच्या तुकड्याचे अवशेष आणि ताम्र पाषाण रोमशी संबंध दर्शवितात. हे अवशेष तर आणि पैठण या ठिकाणी सापडलेल्या अवशेषांशी साधर्म्य दर्शवितात.