शाही लग्नसोहळ्यामुळे भास्कर जाधव अडचणीत

मुंबई: राज्यात दुष्काळामुळे नागरिकांचे जीनवमान विस्कळीत झालेले असताना लग्नसोहळ्यावर पैसा उधळणार्‍यांना पक्षात स्थान नाही; असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. या प्रकाराबाबत जाधव यांनी पवारांची आणि महाराष्ट्राची माफी मागितली आहे.

भास्कर जाधव यांनी नुकताच आपला मुलगा आणि मुलीच्या विवाहात लाखों रुपयांचा खर्च केला. यावर शरद पवारांनी जाधव यांना खडेबोल सुनावले आहेत. राज्यात दुष्काळ असताना विवाहावर असा पैचा उधळण्याची गरज नव्हती असे पवार यांनी सुनावले आहे. त्यामुळे जाधव यांना लग्नसोहळा चांगलाच महागात पडला आहे. जाधव यांचा राजीनामा घेणार का; याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

या शाही लग्न सोहळ्यासाठी मोठा मंडप साकारण्यात आला. त्याच्या सजावटीवर पाण्यासारखा पैसा ओतला. राज्याच्या अनेक भागात दुष्काळ पडल्यामुळं तिथल्या जनतेला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेली असताना मंत्री महोदयांनी ७० हजार नागरिकांच्या भोजनाचा बेत रचला होता. त्यामुळे टीका होवू लागली आहे.

दुष्काळी भागासाठी पै-पैची मदत व्यक्ती, संस्था, देवस्थानं करत आहेत. याचा आदर्श घेण्याऐवजी मंत्री शाही लग्नसोहळ्यावर लाखोंचा चुराडा करत आहेत. हा संदेश जनतेत गेल्याने राष्ट्रवादी पक्ष अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे पवारांना याची दखल घ्यावी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या प्रकरणी पवारांनी जाहीरपणे कानउघाडणी केल्यानंतर जाधव यांनी पवारांची आणि महाराष्ट्राची माफी मागितली आहे. पवार हे आमचे नेते असून त्यांनी माझी चूक दाखवून दिली आहे. यापुढे आपल्याकडून अशी चूक होणार नाही; असे जाधव यांनी सांगितले. या लग्नाचा खर्च आपण आणि आपल्या भावांनी मिळून केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र या लग्नसोहळ्याला नेमका किती खर्च झाला; याचे उत्तर द्यायचे मात्र जाधव यांनी टाळले.

Leave a Comment