सध्यातरी युतीचा विचार नाही – राज ठाकरे

कोल्हापूर- पक्षात येण्याचे किंवा युती करण्याचे वर्तमानपत्रातून कुठे आमंत्रण देतात का; असा सवाल करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणाची खिल्ली उडवली. तसेच शिवसेना-भाजप महायुतीत सध्यातरी सामील होणार नसल्याचेही राज यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या मनोमीलनाच्या चर्चा वर्तमानपत्रातून होतात का असे म्हणत त्यांनी शिवसेनाअध्यक्ष उद्धव ठाकरे यांना सणसणीत टोला हाणला. या वेळी १ लाखाहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता.

राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौर्‍यातील पहिली जाहीर सभा मंगळवारी कोल्हापुरात पार पडली. महाराष्ट्र काबीज करण्यासाठीच माझा राज्यव्यापी दौरा असल्याचे राज यांनी सांगितले. गांधी मैदानात झालेल्या या सभेत कोल्हापुरकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. सभेत राज ठाकरेंनी दुष्काळ, टोलनाके, वीजप्रश्न, प्ररप्रांतीय तसंच राज्यासह देशातील राजकारण्यांवर तोफ डागली.

परप्रांतियांच्या सोईसाठी सरकारने नवा जीआर काढला असून हिंदी, उर्दूमध्ये परीक्षा देण्याची सोय केल्याचेही राज यांनी नमूद केले. तसेच उत्तर प्रदेश, बिहारमधून महाराष्ट्रात ५६ गाड्या येतात, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. परप्रांतियांनी अत्याचार केले तर त्यांना धडा शिकवा असं जाहीर आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्रातील नोकर्‍या मराठी मुलांनाच मिळायला हव्यात, असा आग्रह राज ठाकरे यांनी केला. मराठी माणसावर अन्याय होत असल्यास त्याविरोधात आवाज उठवणारच आणि मराठी माणसासाठी कोर्टाच्या कितीही खटले झेलण्याची आपली तयार आहे, असे सांगत राज यांनी मराठीचा मुद्दा सोडणार नसल्याचे अधोरेखीत केले. राज यांनी भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची खिल्ली उडवली. शेतीतल्या कामांबद्दल अजित पवारांनी आपल्याला शिकवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच स्मारकाचे विषय काढून सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप राज यांनी केला. समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही त्यांनी विरोध केला. राज्यातील गडकिल्ले हिच महाराजांची स्मारंक आहेत, असे राज म्हणाले. त्याचबरोबर नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी माझ्या पाठिशी खंबीर उभे राहा, असं आवाहनही त्यांनी केला.

राज म्हणाले की; महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. टोल म्हणजे निवडणूक निधी झाला आहे. पैशांच्या जोरावर निवडणुका लढविल्या जात आहेत. प्रत्येक मतासाठी तब्बल पाच ते दहा हजार रुपये फेकले जात आहेत. जर राजकीय पक्ष निवडणुकीत एवढे पैसे खर्च करीत असतील तर सत्तेत आल्यावर जनतेला किती ओरबाडत असतील; असा सवाल राज यांनी केला. पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्याच्या सुविधा आदी पायाभूत सुविधा राज्यात दिसत नाहीत. परंतु, सत्तेत बसलेल्या नेत्यांना याचे काही देणे घेणे नाही. त्यांना केवळ आपले खिसे भरण्यात रस आहे. जनतेने मनसेला निवडून दिल्यास आम्ही ही परिस्थिती बदलून दाखवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपला विरोध टोलनाक्यांना नाही; तर टोल भरुनही सोईसुविधा न मिळण्याला आहे. भारतात सर्वात जास्त टोल महाराष्ट्रात आहे आणि सर्वात जास्त अपघात राज्यातच होतात. त्यामुळे मंत्र्यांना पोसण्यासाठी आम्ही टोल भरायचे का; असा सवाल राज ठाकरेंनी केला. तसंच निवडणुकांचे फंड जमा करण्यासाठी राज्यात टोलवसुली सुरु असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी गुजराच्या विकासकामाचंही कौतुक केलं. नरेंद्र मोदींना जे जमले ते महाराष्ट्राला का जमत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. आपल्या भाषणात राज यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, अजित पवार, आर. आर. पाटील. जयंत पाटील यांच्या नकला केल्या आणि उपस्थितांची दादही मिळविली.

Leave a Comment