पेट्रोल- डिझेल पुन्हा भडकणार

नवी दिल्ली: दिवसेंदिवस वाढणार्‍या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या काही काळापासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच आता आणखी वाढ होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

इंधनाच्या दरात इतिहासातील सर्वात मोठी दरवाढ होण्याची शक्यता एका इंग्रजी दैनिकाने वर्तवली आहे. पेट्रोलच्या दरात १ रुपया, डिझेलच्या दरात ११ रुपये आणि एलपीजी गॅसच्या दरात ५०० रुपयांचा होणारा तोटा आता तेलकंपन्या ग्राहकांकडून वसूल करण्याच्या तयारीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात वधारलेले इंधनाचे दर आणि भारताचे बदललेले इंधन धोरण यामुळे हे मोठे संकट कोणत्याही क्षणी उद्भवण्याची शक्यता आहे.

या वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारने जनतेला पेट्रोल- डिझेलचे दर वाढवून, धक्कादायक गिफ्ट दिले होते. पेट्रोलमध्ये ७९ पैशांनी तर डिझेलमध्ये ५१ पैशांनी वाढ झाली होती. त्यानंतर मग डिझेलच्या किंमती दरमहा एक रुपयाने वाढवण्याचा प्रस्ताव तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पाठवला होता.