राष्ट्रवादीला स्वबळाची उबळ

देशात लोकशाही आहे. कोणी काय बोलावे याला काही अटकाव नाही तसेच कोणी किती मोठी स्वप्ने पहावीत यालाही काही बंधन नाही. स्वातंत्र्य असल्यामुळे कोण किती अवास्तव स्वप्न पाहू शकतो याचे बोलके उदाहरण  म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वबळावर मुख्यमंत्रीपद प्राप्त करण्याचे स्वप्न. मुंगेरीलालनेही लाजावे असे हे स्वप्न आहे. राष्ट्रवादीच्या बैठका झाल्या की, पंतप्रधानपदाचे आणि मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न जरूर जाहीर केले जाते. पंतप्रधानपदाच्या स्वप्नाचे तर काही पाहूच नका. त्याचा पुरता विचका झाला आहे. १९९१ साली शरद पवार हे फॉर्मात होते. तेव्हा आर. आर. पाटील यांनी म्हटले होते की, १९८५ मध्ये दोन खासदार निवडून आणणारा भारतीय जनता पार्टी हा पक्ष सत्तेवर येऊ शकतो तर मग १० खासदार असणारा आमचा पक्ष सत्तेवर का येऊ शकणार नाही ? स्वप्ने बघायला बंदी नाही तशी शून्यातून ब्रह्मांड निर्माण होईलच अशी भविष्यवाणी करायलाही काही बंधन नाही.

मात्र १९९९ सालच्या राष्ट्रवादीच्या खासदार संख्येत मोठी चमत्कारिक वाढ होईल असे अजून तरी काही घडलेले नाही. भारतात शरद पवार यांच्याप्रमाणे अनेक नेते पंतप्रधानपदाचे स्वप्न पहात आहेत. राजकीय अस्थिरतेच्या या जमान्यात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. या  गडबडीत आपण देशाचे सर्वोच्च पद प्राप्त करू शकू असे वाटणारे मुलायमसिंग, चंद्राबाबू नायडू, जयललिता, मायावती, नितीशकुमार, ममता बॅनर्जी हे नेते भारतात आहेत पण त्यात शरद पवार यांचा क्रमांक शेवटचा आहे.  या यादीवर नजर टाकल्यास असे लक्षात येते की, ते नेते आपल्या राज्यात स्वबळावर लढत असतातच पण कोणाशी युती केलीच तर त्या युतीत ते मोठे पक्ष असतात. राष्ट्रवादीची स्थिती तशी नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याची आवई उठवतो पण ती आवई ’लांडगा आला रे आला’ या आवई सारखी असते. राष्ट्रवादीला तशी स्वबळावर  लढण्यास कोणी बंदी घातलेली नाही पण त्यांची तेवढी ताकद नाही. त्यांना राज्यात काँग्रेसशी युती केल्याशिवाय निवडणुका लढवता येत नाहीत आणि त्या युतीतही राष्ट्रवादीची भूमिका दुय्यम असते. आता महाराष्ट्रात काँग्रेसचे  १८ खासदार निवडून आले आहेत आणि राष्ट्रवादीचे ९ खासदार आले आहेत. लोकसभेत आपले २५ खासदार निवडून आणून पंतप्रधान होण्याचा हिशेब पवार मांडत असतील पण त्यांना काँग्रेसशी युती केल्याशिवाय तसा हिशेबही घालता येणार नाही.  त्यांना युतीत २५ जागा लढवायलाही मिळणार नाहीत. मागच्या लोकसभा  निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला २१ जागा द्यायलाच किती खळखळ केली होती ? आता तर या वाटाघाटी फारच कटकटीच्या होणार आहेत.

पवारांनी डावपेच लढवून २५ जागा पदरात पाडून घेतल्याच तरी त्या सगळ्या निवडून याव्यात एवढे काही त्यांचे राज्याच्या राजकारणात वर्चस्व नाही. ही गोष्ट ते स्वतःही मान्य करतील. पवारांनी प्रसंगी  युती मोडू पण अधिक जागा लढवू असा काही निर्धार केलाच तर युती मोडल्याचा परिणाम म्हणून त्यांच्या आहेत त्याही जागा कमी होतील. एकंदरीत पवारांची पंचाईत अशी आहे की, युती केली तर ती केली म्हणून जागांना मर्यादा येणार आहेत आणि न केली तर ती न केल्यामुळे त्यापेक्षा मोठी मर्यादा येणार आहे. पवारांचा बेडूक फार फुगणार नाही. पण स्वप्ने बघायला काही बंधन नाही.

असाच सारा हिशेब त्यांच्या स्वबळावरच्या मुख्यमंत्रीपदालाही लागू आहे.राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा यावर काही वाद होणार नाही. उमेदवार ठरलेला आहे.  तो वादातीत आहे. व्यक्ती म्हणून, अनुभवाच्या पातळीवर समर्थ आहे.  पण मुख्यमंत्रिपदाचे काय ? केन्द्रात व्यक्ती सक्षम आहे  पण पक्ष समर्थ नाही. कोणाशी युती करूनही तो पुरेशा जागा मिळवू शकणार नाही. राज्याच्या बाबतीत नेमकी उलट स्थिती आहे. पक्षाला काँग्रेसशी युती करून बहुमतात येता येते. तीन निवडणुकात तसे यश मिळालेही आहे. पक्ष सत्तेवर येऊ शकतो पण मुख्यमंत्रिपद मिळालेच तर त्यासाठी पात्र उमेदवार पक्षाकडे नाही. अजित पवार यांच्या नावाचा तसा बोलबाला झालेला आहे पण आता काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवार यांचा ‘गडकरी’ करून टाकला आहे. त्यामुळे तर ते या पदाची आशा धरू शकत नाहीतच पण मुळात शरद पवारच अजित पवारांना ती संधी देणार नाहीत.

शरद पवार यांनी आपल्यावर अन्याय केला तर पक्षातच आपल्या मागे येणारा एक वर्ग आहे असे अजित दादांना वाटत होते. त्यांनाच नाही तर त्यांच्या पक्षात आणि पक्षाच्या बाहेरही अनेकांचा तसा समज होता पण मध्यंतरी झालेल्या त्यांच्या राजीनामा नाट्याने अजित पवार यांचे पक्षातले आणि काकांच्या मनातले स्थान पुरतेपणी स्पष्ट झाले आहे. शरद पवार सुप्रिया दिल्लीतच राहील असे वारंवार म्हणत असतात तसे त्यांनी म्हटले की अजित दादांना गुदगुल्या होतात पण, शेवटी ते  शरद पवार आहेत. त्यांच्या मनाचा थांग कोणाला लागलाय का ? ते कोणत्याही क्षणी पटकन सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर करतील. त्या मुख्यमंत्री होतीलही. अजितदादा पेक्षा त्या लोकप्रिय आहेत. पण त्यांचे  मुख्यमंत्री होणे स्वबळावर सुतराम शक्य नाही. राष्ट्रवादीचे  मुख्यमंत्रीपद हे आवाक्यातले स्वप्न आहे. वास्तव आहे पण स्वबळावर नव्हे.

Leave a Comment