उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात १२ नवीन चेहरे; पहिला विस्तार

लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. राज्यात सत्ता हस्तगत केल्यापासून मंत्रिमंडळाचा हा पहिलाच विस्तार असून १२ नवीन चेहर्‍यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गोंडामध्ये मुख्य वैद्यकीय अधिकार्‍याशी धक्काबुक्कीचा आरोप असलेल्या विनोद कुमार सिंह यांचाही समावेश आहे.

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आणि पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यांचे नजीकचे सहकारी राजेंद्र चौधरी आणि विनोद कुमार सिंह उर्फ पंडित सिंह यांनीही आज शपथ घेतली. चौधरी यांना कॅबिनेट मंत्री बनविण्यात आले आहे. या दोघांनाही मागील वर्षी गोंडाच्या मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांना केलेल्या कथित मारहाणीनंतर मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते.

लखनौ विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे आणि भाजपचा प्रभाव असलेल्या अयोध्येमधून विधानसभा निवडणुकीत बाजी मारणार्‍या तेज नरैन पांडे उर्फ पवन पांडे यांनाही टीम अखिलेशमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून निवडून आलेल्या गायत्रीप्रसाद प्रजापती यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. अमेठी हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा लोकसभा मंतदारसंघही आहे.

आज शपथ घेतलेल्या मंत्र्यापैकी तिघे ब्राम्हण असून मागासवर्गीय समाजातील पाच जणांचा यात समावेश आहे. दोघे ठाकूर तर प्रत्येकी एकजण जाट आणि वैश्य समाजातील आहे. विजयकुमार मिश्रा यांना राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) करण्यात आले असून इतर दहाजणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अखिलेश सरकारमध्ये या १२ मंत्र्याचा समावेश करण्यापूर्वी मंत्रीमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या ४६ होती. तरतूदीनुसार मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त ६० जणांचा समावेश केला जावू शकतो.

Leave a Comment