
लखनौ: उत्तरप्रदेशच्या खादी आणि ग्रामोद्योग विभागाचे मंत्री राजाराम पांडे यांनी एका वरिष्ठ प्रशासनिक महिला अधिकार्याच्या सौंदर्याची एका जाहीर कार्यक्रमात स्तुती केल्याने वादंग सुरू झाले आहे.

लखनौ: उत्तरप्रदेशच्या खादी आणि ग्रामोद्योग विभागाचे मंत्री राजाराम पांडे यांनी एका वरिष्ठ प्रशासनिक महिला अधिकार्याच्या सौंदर्याची एका जाहीर कार्यक्रमात स्तुती केल्याने वादंग सुरू झाले आहे.
पांडे यांनी सुलतानपूर येथे बेरोजगारांना धनादेश वाटण्याच्या एका कार्यक्रमात बोलताना ही स्तुतीसुमने उधळली. बोलता बोलता ते भरकटले आणि त्यांनी थेट तेथे उपस्थित असलेल्या जिल्हादंडाधिकारी के. धनलक्ष्मी यांच्या सौदर्याची तारीफ सुरू केली त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या धनलक्ष्मी यांना अवघडल्यासारखे झाले. पांडे म्हणाले की आधीच्या जिल्हादंडाधिकारी कामीनी चौहान या ही सुंदर होत्या. त्यावेळी मला वाटत होते की त्यांच्या सारखी दुसरी कोणतीही सुरेख महिला अधिकारी असणे शक्य नाही परंतु विद्यमान जिल्हादंडाधिकारी धनलक्ष्मी या कामिनी चौहान यांच्यापेक्षा अधिक सुंदर आहेत.
त्यांच्या या विधानाला तेथे उपस्थित असलेल्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार दाद दिली. तथापी समाजवादी पक्षाच्या अन्य नेत्यांनी मात्र हे मर्यादा उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानांमुळे सरकार आणि पक्षाविषयी लोकांच्या मनात चुकीचा संदेश गेला असून मंत्र्यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागीतली पाहिजे अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रविदास मोहपात्रा यांनी केली आहे.