शिवगंगा: लाभार्थींच्या खात्यात थेट निधी हस्तांतरण करण्याच्या (डायरेक्ट कॅश ट्रान्सफर) केंद्र सरकारच्या योजनेचे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज जोरदार समर्थन केले. मध्यस्थाला दूर ठेवणार्या या योजनेला काहीजण विरोध करत असल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
विजया बँकेच्या एक हजार 334 व्या शाखेचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना अर्थमंत्री म्हणाले की, कुठल्याही मध्यस्थाशिवाय आणि खाबूगिरी टाळण्यासाठी लाभार्थींच्या थेट खात्यात निधी जमा करण्याच्या या कल्याणकारी योजनेत काहीही चुकीचे नाही. या योजनेंतर्गत १०० दिवसांचा रोजगारी हमी कार्यक्रम, वृद्धांना निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय विमा आदींची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.
सध्या देशातील 51 जिल्ह्यांत अंमलबजावणी करण्यात येत असलेली ही योजना या वर्षात सातशेहून अधिक जिल्ह्यात राबविली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. तमिळनाडू सरकारकडून या योजनेला केल्या जात असलेल्या विरोधाचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. केंद्र सरकारकडून शेतीसह विविध प्रकारची कर्जे दिली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.