रेल्वे भाडेवाढीची पुन्हा टांगती तलवार?

चंदिगढ: रेल्वेच्या प्रवासी भाड्यात नुकतीच वाढ करण्यात आली असताना या महिनाअखेर सादर होणार्‍या रेल्वेच्या अर्थसंकल्पात पुन्हा दरवाढ करण्याचे संकेत रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांनी दिले. याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला कुशलतेने बगल देत अर्थसंकल्प सादर होईपर्यंत प्रत्येकाने वाट पाहावी, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

येथे भरविण्यात आलेल्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बन्सल म्हणाले की, रेल्वेच्या प्रवासी भाड्यात आणखी वाढ होईल की नाही याबाबत आपण अद्याप काहीही स्पष्ट केले नाही. याविषयी आपल्याला काहीही माहिती नसून प्रथम रेल्वेचा अर्थसंकल्प मांडला जाऊ द्या. त्यानंतरच तुम्हाला याबाबत समजेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वेच्या भाड्यात आणखी वाढ होणार असल्याच्या प्रसारमाध्यमातील वृत्ताबाबत बोलताना ते म्हणाले की, आपण याबाबत काहीही सूचित करत नसून यातून कुठलाही अंदाज न काढण्याची सूचना त्यांनी केली. नुकतीच करण्यात आलेली भाडेवाढ २२ जानेवारीपासून लागू झाली आहे. रेल्वेमधून खादीला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे बोर्डाशी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरादाखल सांगितले.

Leave a Comment