लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावरून सरकारकडून विश्‍वासघात-अण्णा हजारे

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजूर केलेले सुधारित लोकपाल विधेयक कुचकामी आहे. प्रभावी लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने विश्‍वासघात केला आहे, असे जोरदार टीकास्त्र आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोडले. गरज भासल्यास लोकपालसाठी येथील रामलीला मैदानावर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अण्णा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजूर केलेले सुधारित लोकपाल विधेयक अमान्य असल्याचे स्पष्ट केले. केंद्र सरकार आमचा आणि देशाच्या जनतेचा वारंवार विश्‍वासघात करत आहे. आमच्या विशिष्ट मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर मी ऑगस्ट 2011 मध्ये 12 दिवसांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र, हे आश्‍वासन पाळण्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अपयश आले आहे, असे टीकास्त्र अण्णांनी सोडले. प्रथम ते चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना लोकपालच्या कक्षेत आणणे, राज्यांमध्ये लोकायुक्त स्थापन करणे आणि नागरिकांची सनद बनवणे या तीन मुद्द्यांवर पंतप्रधानांनी लेखी आश्‍वासन दिले होते. मात्र, हे तिन्ही मुद्दे सुधारित लोकपाल विधेयकात समाविष्ट करण्यात आलेले नाहीत, असे ते म्हणाले.
केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) यांना निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र संस्था बनवण्याची मागणी त्यांनी केली. सीबीआय आणि सीव्हीसीवरील नियंत्रण केंद्र सरकार सोडत नाही; तोपर्यंत भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढा प्रभावी ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. सरकारने केलेल्या विश्‍वासघाताची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आपण देशव्यापी दौरा करणार आहोत. लोकसभेच्या 2014 मध्ये होणार्‍या निवडणुकांमध्ये स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही जनतेला करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी, मोदींचीही
उडवली खिल्ली
यावेळी अण्णांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. सत्ता हे विष आहे, अशाप्रकारचे वक्तव्य राहुल यांनी केले होते. याबाबत पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावर सत्ता विष असेल तर सरकार आणि राजकीय पक्ष त्यामागे का धावतात? ते सत्ता का सोडत नाहीत? सत्ता विष नव्हे तर व्यसन आहे, अशी प्रतिक्रिया अण्णांनी दिली. भावी पंतप्रधान म्हणून मोदींचे नाव पुढे केले जात आहे. या मुद्द्यावर अण्णा म्हणाले, मोदी पंतप्रधान बनले तर देशासाठी काही चांगले करतील याविषयी मला शंका आहे. त्यांनी त्यांच्या राज्यात लोकायुक्तांची नियुक्ती केली नाही. असे असताना त्यांच्याकडून लोकपालची अपेक्षा कशी काय करायची?

Leave a Comment