लान्स नाईक हेमराजचे डोके तोडणारयाला ५ लाखांचे इनाम

नवी दिल्ली दि. ३१ – भारतीय सीमेवर गस्त घालणार्यां पथकावर हल्ला करून लान्स नायक हेमराज आणि लान्स नायक सुधाकर सिग यांना कंठस्थान घालून हेमराजचे तोडलेले शिर परत न करणार्‍या पाकिस्तानने हे कृत्य कराणार्‍या लष्करचा सदस्य अन्वर खान याला ५ लाख रूपयांचे पारितोषिक जाहीर केले असल्याचे वृत्त आहे. लष्कराचे परस्पर सैन्याबाबत असलेले नीतीनियम तोडण्यात पाकिस्तान किती आघाडीवर आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. भारतीय गुप्तवार्ता विभाग, लष्करी गुप्तवार्ता विभाग, रॉ यांनी पाकिस्तानच्या या कटाचा सर्व उलगडा करण्यात यश मिळविले आहे. त्यानुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करे तैय्यबा, लष्करे जैश या अतिरेकी संघटना, आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर यांनी परस्पर सहकार्यानेच हा कट रचला होता हे उघड झाले आहे.

या विभागांनी मिळविलेल्या माहितीनुसार अन्वर खान हा अशाच प्रकारच्या कृत्यात १९९६ सालीही सहभागी होता. त्यावेळी त्याने भारतीय कॅप्टनचे डोके तोडले होते. पाक लष्कर आणि आयएसआय यांनी एलओसी जवळ तरूणांची भरती सुरू केली असून त्यांना घातपाताचे प्रशिक्षण दिले जाते तसेच त्यांना लष्करी युनिफॉर्मही पुरविले जातात. आर्मी इर्रेग्युलर असे त्यांना म्हटले जाते. सीमारेषेवरच त्यांना तैनात केले जाते.

या तरूणाना भारतीय सीमेच्या आत भूसुरंग पेरल्याबद्दल ५ हजार, बंदुकीने सैनिक मारल्यास १० हजार तर सैनिकाचे डोके तोडल्यास ५ लाख रूपये अशी रोख पारितोषिके दिली जातात. या तरूणांना सतत प्रेरणा मिळावी यासाठी बक्षीसांची आमिषे दाखविली जातात असेही आता स्पष्ट झाले आहे.