दलित उद्योजकांनी शोधली स्वयंप्रकाशाची वाट

‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स एण्ड इंडस्ट्रीज’ (डिक्की) च्या माध्यमातून दलित उद्योजक घडविण्याचे महत्वपूर्ण कार्य केल्याबद्दल मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त करणारे डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रेरणादायी प्रकाशझोत खास ‘माझा पेपर’च्या वाचकांसाठी-

दलितांना ताठ मानेने जगायला शिकवणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाने सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आर्थिक क्षेत्रात केवळ स्वयंपूर्णच नव्हे तर सामर्थ्यशाली बनावे; नोकर्‍या मागणारे न रहाता देणारे बनावे असे स्वप्न पाहिले आणि आपल्या कार्यकाळात ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अपार प्रयत्नही केले. मात्र डॉ. बाबासाहेबांच्या इतर विचारसरणीप्रमाणेच सत्ताधार्‍यांनी, राजकारण्यांनी आणि दलितांचे नेते म्हणवून घेणार्‍यांनी या स्वप्नाकडेही फारसे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही. मात्र दलित समाजातल्या तरुणांना उद्योगप्रवण, व्यावसायिक बनवण्याच्या उद्देशाने दलित उद्योजकांनीच स्थापन केलेल्या ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स एण्ड इंडस्ट्रीजने कंबर कसली आहे.

स्वातंत्र्योत्तर काळाच्याही आधीपासून मागासवर्गीय समाजात स्वाभिमानाची ठिणगी पेटली. डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार त्यांनी शिक्षणाची कास धरली. शासकीय नोकर्‍यांमध्ये अधिकाराच्या पदावर असलेल्या मागासवर्गीयांची संख्या उल्लेखनीय आहे. सन २००४ मध्ये देशभरात खाजगी क्षेत्रात नोकरीसाठी दलित, मागासवर्गीयांना आरक्षण मिळावे या मागणीने जोर धरला. खाजगी क्षेत्रातल्या धुरिणांनी या मागणीला विरोध व्यक्त केला. मात्र दलितांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी आरक्षण किंवा खाजगी क्षेत्राकडून स्वयंस्फूर्तीने सकारात्मक कृती याशिवाय पर्याय नसल्याची जगभरातली भावना आणि आरक्षणासाठी देशांतर्गत जनमताचा रेटा; यामुळे केंद्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करू शकले नाही. पंतप्रधान मनमोहनसिंग आणि तत्कालीन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मीरा कुमार यांनी; आरक्षणाचा कायदा नको असेल तर स्वत:हून दलितांच्या रोजगाराची जबाबदारी घ्या; असं उद्योग क्षेत्राला निक्षून सांगितले. त्यानुसार उद्योग क्षेत्राने ‘टाटा सन्स’चे संचालक डॉ.जमशेद इराणी यांच्या अध्यक्षतेखाली ‘सकारात्मक कृती समिती’ (Affirmative Action committee) स्थापन केली.

या समितीने दलितांना खाजगी उद्योगात सामावून घेण्यासाठी कालबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम आणि इतर बाबींचा विचार करून आपला ‘कृती आराखडा’ केंद्र शासनाला सादर केला. या आराखड्याची अर्थातंच ‘सरकारी खाक्याने अंमलबजावणीही सुरू झाली. मात्र अंमलबजावणीचा वेग आणि पद्धत पहाता हा आराखडा म्हणजे निव्वळ फार्संच ठरणार अशी लक्षणं दिसू लागली. याशिवाय या आराखड्याप्रमाणे जो प्रशिक्षणक्रम ठरवण्यात आला त्यावरून या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना शिपाई, कारकून अशा तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्याच नोकर्‍या मिळणार हे ही जवळपास निश्चित होतं.

साधारण याच कालावधीत जागतिकीकरण आणि खाजगीकरणाचे परिणाम खर्‍या अर्थाने दिसून येऊ लागले आणि इथून पुढच्या काळात शासकीय, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात एकूणच नोकर्‍यांचे प्रमाण घटतच जाणार हे निश्चित झाले. या पार्श्वभूमीवर दलित समाजातून पुढे आलेले आणि उद्योग, व्यवसाय क्षेत्रात स्थिरस्थावर झालेले काही उद्योजक, व्यावसायिक एकत्र आले. समाजाच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी केवळ नोकर्‍यांच्या मागे लागून चालणार नाही; तर उद्योग, व्यवसायाची कास धरणे गरजेचे आहे; यावर या सगळ्याचे एकमत होते. याच विचारातून तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगारात मदत करण्याच्या उद्देशाने सन २००२मधे एससी, एसटी चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करण्यात आली होती.

बदलत्या परिस्थितीत एससी-एसटी चेंबर ऑफ कॉमर्सच्या कामाचा आवाका, व्याप्ती आणि कार्यकक्षा वाढवून त्याचे रुपांतर ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ या विश्वस्त संस्थेत करण्यात आले. संस्थेचे महत्वाकांक्षी अध्यक्ष आणि फॉर्च्युन कन्स्ट्रक्शन्सचे संचालक मिलिंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दलित युवकांमधून यशस्वी उद्योजक घडवण्याचे कार्य संस्था करत आहे. सरचिटणीस सुशील कदम, खजिनदार सुनील खंडाळे, संचालक अमित अवचरे, रुपेश सोनावणे, तुकाराम पांचाळ, संदीप कळवळे या पदाधीकार्यासह अनेक मान्यवरांची साथ कांबळे यांना आहे.

“मागच्या दहा- पंधरा वर्षापासून दलित उद्योजक, व्यावसायिकांच्या पहिल्या पिढीने उद्योग आणि सेवा क्षेत्रात पाय रोवून राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला आहे. मात्र त्यांची संख्या तुलनेने अत्यंत थोडी आहे. या क्षेत्रात येऊ पहाणार्‍यांना पुरेशा संधी आणि ‘एक्स्पोजर’च्या अभावी उद्योग, व्यवसाय सुरू करणे आणि एका मर्यादेबाहेर व्यवसायवृद्धी करणं अवघड जाते. अशा होतकरू दलित उद्योजकांना सहकार्य देण्याचे महत्वपूर्ण कार्य संस्था करीत आहे;” असे कांबळे नमूद करतात.

“बहुतेक दलित आपल्या ज्ञान आणि कर्तृत्वापेक्षाही आरक्षणाचा टेकू आणि शासकीय सवलतीच्या आधारे आपल्या वकूबापेक्षाही अधिक वेगाने पुढे सरकतात; असा बहुतांश दलितेतर मंडळींचा आक्षेप असतो. काही दलित युवकांमधेही आपल्या परंपरागत सामाजिक, आर्थिक स्थानामुळे आपल्याला आरक्षणाचा एकमेव आधार आहे; असा न्यूनगंड आढळतो. दलित युवकांनी केवळ नोकर्‍यांच्या मागे न धावता उद्योग, व्यवसायात स्वत: प्रस्थापित होऊन समाजाच्या आणि देशाच्या उभारणीतही मोलाचे योगदान दिले; तर हा आक्षेपही आपोआपच खोडून निघेल आणि दलित समाजातल्या युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन या उद्योजकांचा आदर्श त्यांच्यापुढे असेल;” अशीही एक भूमिका या कामामागे असल्याचं ते सांगतात.

सुरुवातीला या संस्थेचं कार्य महाराष्ट्रात सुरू झाले. पुण्यातल्या मुख्य कार्यालयाशिवाय मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी संस्थेच्या शाखा आहेत. मात्र केवळ दोन वर्षाच्या कालावधीत गुजराथ, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यात विस्तार करून सन २०१५ पर्यंत संपूर्ण देशभरात पोहोचण्याचा संस्थेचा निर्धार आहे. संस्थेच्या माध्यमातून उद्योग, व्यवसायाच्या क्षेत्रात पदार्पण करणार्‍यांना तांत्रिक, अभियांत्रिकी, वित्त नियोजन, कर नियोजन, मनुष्यबळ विकास, विपणन, गुणवत्ता नियंत्रण, कायदेशीर सल्ला अशा सर्व बाबतीत मार्गदर्शन केले जाते. नवोदित उद्योजकांना प्राथमिक ज्ञान मिळावे आणि प्रस्थापित उद्योजकांना आपलं ज्ञान अद्ययावत करता यावे यासाठी वेळोवेळी तज्ज्ञांची, यशस्वी उद्योजकांची व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्र, प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षणात्मक कार्यक्रमांचे आयोजन संस्थेमार्फत केले जाते.

संस्थेने दलित उद्योजकांच्या उत्पादनांची आणि सेवांची ओळख व्हावी, त्याला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, उद्योजकांच्यात संवाद प्रस्थापित होऊन व्यवसायवृद्धी व्हावी या उद्देशाने दरवर्षी ‘दीप एक्स्पो’ हे औद्योगिक प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात विविध उत्पादने, सेवा उद्योग, बांधकाम उद्योग, अन्न आणि कृषी उद्योग, चामडे उद्योग, करमणूक उद्योग, हॉटेल्स, किरकोळ विक्री उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू यांची बाजारपेठेत ओळख निर्माण होते आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध होते. त्याच बरोबर व्यवसायवृद्धी आणि मार्गदर्शनाच्या निमित्ताने दलित उद्योजकांना इतर मान्यवर उद्योजकांना भेटता येते.

या महत्वपूर्ण कार्याच्या माध्यमातून या संस्थेने आणि त्यातून प्रेरणा घेऊन नव्या क्षितीजांना गवसणी घालण्यासाठी झेपावलेल्या युवा उद्योजकांनी गौतम बुद्धांचा ‘अत्त दीप भव’ हा संदेशंच खर्‍या अर्थाने आचरणात आणला आहे.

Leave a Comment