अरभाट आणि इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला ‘पुणे 52’ हा नात्यांमधला सस्पेन्स थ्रीलर येत्या १ फेब्रुवारीला भारतभर प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्रात १८ जानेवारीला त्याचे प्रदर्शन झाले आहे. देशात प्रदर्शित होणारा हा पहिलांच मराठी चित्रपट असल्याने त्याचे हे यश लक्षवेधी ठरले आहे. दिल्ली, हरियाना, बंगळुरू, हैद्राबाद, अहमदाबाद, चेन्नई, कलकत्ता, जयपूर, इंदोर, ग्वाल्हेर, पंजाब इत्यादी शहरांमध्ये असलेल्या पीव्हीआरच्या मल्टिप्लेक्समध्ये ‘पुणे ५२’ चे नियमित खेळ होणार आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रयोगशीलता, वैविध्य आणि नावीन्य जपण्याच्या उद्देशाने उमेश-गिरीश कुलकर्णी यांची निर्मिती असलेला पुणे ५२ महाराष्ट्रात समीक्षक आणि प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला. निखिल महाजन यांनी ‘पुणे ५२’ चे कथालेखन आणि दिग्दर्शन केले आहे. न्यूझीलंडच्या जेरेमी रिगेन यांनी अतिशय वेगळ्या स्टाईलने या चित्रपटाचे छायाकंन केले आहे. रंग दे बसंती, जिंदगी ना मिलेगी दोबाराचे बेलॉन फॉन्सेका यांनी टिपलेला ध्वनी तसेच आतिफ अफझल यांनी दिलेले संगीत, ह्युंगजंगशिम यांनी चित्रपटाला दिलेले पार्श्वसंगीत या चित्रपटाची खास वैशिष्टये आहेत.
पुणे शहरात विशिष्ठ कालखंडात झालेल्या गतिमान बदलाची पार्श्वभूमी ‘पुणे ५२’ला आहे. १९९२ च्या सुमारास आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे सर्वच क्षेत्रात झपाट्याने बदल होत गेला आणि एरव्ही ‘पेन्शनरांचे’ म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर ‘मॉल’ मधील ‘तरूणाई’ने कधी बहरले हे कळलेच नाही. या गतिमान बदलाचा मध्यमवर्गीयांच्या जीवनावर फार मोठा परिणाम झाला. एका खासगी गुप्तहेराच्या जीवनातही कसे अचानक महत्वपूर्ण बदल घडले त्याचीच विलक्षण गूढरम्य कथा ‘पुणे ५२’मध्ये चित्रित करण्यात आली आहे. अमर आपटे नावाच्या खासगी गुप्तहेराची मध्यवर्ती भूमिका गिरीश कुलकर्णी याने साकारली आहे.
सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिका आहेत. भारती आचरेकर, किरण करमरकर, श्रीकांत यादव यांच्यासोबत प्रसिद्ध गीतकार स्वानंद किरकिरे आणि प्रख्यात साहित्यिक गो. पु. देशपांडे हे या चित्रपटात पाहुणे कलाकार आहेत.