थिरूवनंतपुरम: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य शाखेचे सेक्रेटरी पिनारयी विजयन यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात आपण खरे बोलल्यानेच काही वर्षांपूर्वी आपली पक्षाच्या पॉलिटब्युरोतून हकालपट्टी करण्यात आली; असा आरोप केरळातील ज्येष्ठ मार्क्सवादी नेते आणि माजी मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंदन यांनी केला.
विजयन प्रकरणात आपण जी सत्य बाजू आहे त्याच अनुषंगाने भूमिका घेऊ पण पक्षाने जी भूमिका घेतली आहे त्यानुसार आपण भूमिका बदलणार नाही; असे पॉलिट ब्युरोत सांगितले होते त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागला असे त्यांनी बुधवारी येथे बोलताना सांगितले.
विजयन हे 1997 साली केरळात उर्जा खात्याचे मंत्री असताना केरळातील तीन वीज प्रकल्पांच्या नूतनीकरणाच्या कामाचे कंत्राट एसएनसी लॅट्टेर कंपनीला देताना त्यात भ्रष्टाचार केला होता. कॅगच्या अहवालातही ही बाब समोर आली होती. त्या प्रकरणात जे सत्य आहे त्याच बाजूने आपण उभे राहिलो पण पक्षाने माझ्यावर राग धरला आणि माझे पॉलिटब्युरोतील सदस्यत्व त्यांनी रद्द केले असे अच्युतानंदन म्हणाले. या कंत्राट प्रकरणात राज्याच्या तिजोरीचे 374 कोटी रूपयांचे नुकसान झाले असा दावाही त्यांनी केला.