दुष्काळी परिस्थितीतही अन्नधान्य उत्पादन स्थिर: कृषीमंत्री पवार

नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षात देशातील अन्नधान्य उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा काही अंशी कमी असले तरी ते 250 दशलक्ष टनांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. आणि देशाची गरज भागवण्यासाठी ते पुरेसे आहे असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षी देशात 259 दशलक्ष टन इतके अन्नधान्य उत्पादन झाले होते.यंदा या उत्पादनात काहीशी घट झाली असली तरी हा आकडा 250 दशलक्ष टनांवर जाईल आणि तो देशांतर्गत गरज भागवण्यासाठी पुरेसा आहे असे त्यांनी सांगितले.सध्या सरकारपुढे अन्नधान्याच्या उपलब्धतेची समस्या नाही परंतु त्याच्या साठवणुकीची मात्र समस्या आहे असे पवार म्हणाले.

चालू हंगामातील रबी पिकाच्या पेरण्यांबाबत माहिती देताना पवार म्हणाले की; धान्यांची पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. परंतु डाळींचे पेरणी क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. तथापि महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचा अन्नधान्याच्या उपलब्धतेवर काही प्रमाणात विपरीत परिणाम होऊ शकतो. गव्हाच्या बाबतीत स्थिती अत्यंत चांगली असून यंदा आपण गेल्यावर्षी इतकेच गव्हाचे उत्पादन करू शकतो अशी स्थिती असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीबाबत माहिती देताना पवार म्हणाले की; मराठवाडा आणि पुणे विभागाला दुष्काळी स्थितीचा मोठा फटका बसला आहे. अशा प्रकारची दुष्काळाची स्थिती या भागात आपण यापूर्वी कधी पाहिलेली नव्हती असेही ते म्हणाले. पिण्याच्या पाण्याचे तेथे मोठे दुर्भिक्ष आहे. काही ठिकाणी तर 14-15 दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी दिले जात असल्याचे आपण ऐकले आहे असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment