‘अशाच एक बेटावर’ लवकरंच पडद्यावर

पुणे: मायानगरी मुंबईतून नऊ अनोळखी व्यक्ती निर्मनुष्य बेटावर एकाकी बंगल्यात गूढ रहस्याचा शोध घेण्यासाठी एकत्र येतात. तेथे त्यांच्या भोवती अनपेक्षित घटनांची मालिकाच तयार होते. या घडणा-या घटनांचे मूळ या प्रत्येकाच्या गतायुष्यात घडलेल्या घटनांवर आधारित असते. प्रत्येक नवीन रात्र नवीन रहस्याला जन्म देते आणि यातूनच भयचकीत करून सोडणा-या घटनांची मालिका वेगाने घडत जाते. रहस्याचा खिळवून ठेवणारा हा थरारक प्रवास रेखाटणारा ‘अशाच एका बेटावर’ हा मराठी चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय.

लीना नांदगांवकर, जावेद पठाण, दिवाकर सावंत यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. मराठी सिनेमात आज वेगवेगळे विषय येत आहेत. बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये दर्जेदार रहस्यपटांची मोठी परंपरा असली तरी मराठीत मात्र असे विषय क्वचितच येतात. ‘सॄष्टी फिल्म्स’च्या माध्यमातून लीना नांदगांवकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. जगप्रसिद्ध कादंबरीकार अगाथा ख्रिस्ती यांच्या कादंबरीचा विषय भावल्यामुळेच ‘अशाच एका बेटावर’ ची निर्मिती त्यांनी केली.

नांदगांवकर यांनी याआधी रंगभूमी आणि चित्रपटांतून अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटविला आहे. त्यांचा निर्माती म्हणून हा पहिलाच चित्रपट असला, तरी यापूर्वी त्यांनी मच्छिंद्र कांबळी, पुरूषोत्तम बेर्डे यांसारख्या मान्यवरांच्या संस्थांमधून नाटक आणि चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. मराठीत दर्जेदार कलाकॄती तयार कराव्यात या हेतूने त्या सिनेनिर्मितीत उतरल्या आहेत. जाहिरात क्षेत्रामध्ये गेली २५ वर्षे फॅशन इंडस्ट्रियल फोटोग्राफ्रर म्हणून काम केल्यानंतर संजू हिंगे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.

जगप्रसिद्ध कादंबरीकार अगाथा ख्रिस्ती यांच्य ७० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘अ‍ॅण्ड देन देअर वेअर नन’ या रहस्यमय कादंबरीवर आधारीत असलेल्या कथेवर लेखक संजय पवार आणि चिंतन मोकाशी यांनी पटकथा लिहीली असूण रहस्यपटातील नेमका थरार आपल्या संगीतातून मिलिंद जोशी यांनी मांडला आहे. रोहिणी निनावे, सदानंद डबीर, मिलिंद जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना देवकी पंडीत आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या सुरेल आवाजाची साथ मिळाली आहे.

‘अशाच एका बेटावर’ चे छायाचित्रण राजू केजी, नॄत्यदिग्दर्शन राजेश बिडवे, अमोल मुजुमदार, संकलन क्षितीज पावसकर आणि अभिजीत गिरूळकर यांनी केले आहे.

अलिबागच्या निसर्गरम्य परिसरात चित्रीत झालेल्या या चित्रपटात अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, मधुरा वेलणकर, सई ताम्हणकर, यतिन कार्येकर, शरद पोंक्षे, संजय मोने, मंगेश देसाई, कमलेश सावंत, पूनम जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला पहायला मिळेल. ८ फेब्रुवारीला ‘अशाच एका बेटावर’ मधील रहस्याचा थरार आपल्या जवळच्या चित्रपटगृहात अनुभवायला मिळणार आहे.

Leave a Comment