नवी दिल्ली – भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)विरुद्ध दहशतवाद पसरवत असल्याचे पुरावे आढळल्यास त्यांच्या सर्व नेत्यांना अटक करून या दोन्ही संघटनांवर बंदी घालावी, असे आव्हान भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आज केेंद्र सरकारला दिले. केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी नुकताच भाजप व आरएसएसच्या शिबिरांमध्ये दहशवादी प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप केला होता.
या आरोपावर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सिंह यांनी पुढील महिन्यात तिसर्या आठवड्यात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असले तरी आपली शिंदेंविरोधी मोहीम सुरू राहिल, असे स्पष्ट केले.
ते म्हणाले की, गृहमंत्र्यांना भाजप आणि आरएसएस दहशतवादाला खतपाणी घालतात असे वाटते; परंतु आम्ही दहशतवादी असल्याचे त्यांना वाटत असल्यास आम्हाला खुशाल तुरुंगात डांबावे. संघ आणि भाजपविरुद्ध दहशतवादाचा पुरावा असल्यास तो उघड का केला जात नाही? या दोन्ही संघटना दहशतवादी असल्याचे वाटत असल्यास त्यांच्यावर बंदी घालावी, असे आव्हान त्यांनी दिले.
शिंदे यांच्या वक्तव्याचे जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईदने केलेले समर्थन दुर्देवी आहे. सईद आता भारतच दहशतवादी देश असल्याचे जगाला ओरडून सांगत आहे. या सर्वांमुळे देशाची प्रतिमा खालावत असतानाही पंतप्रधान, सोनिया गांधी प्रतिक्रिया का देत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.