कादंबरी आणि मालिकेच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर गारूड करणारी दुनियादारी आता चित्रपटरूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. सुहास शिरवळकर लिखित दुनियादारी या कादंबरीवर चित्रपट
बनवण्याच्या संकल्पनेला प्रत्यक्षात साकारत दिग्दर्शक संजय जाधव यांनी चित्रपट निर्मितीचचे शिवधनुष्य पेलले..
नुकतेच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाले. यानिमित्ताने कमालिस्तान स्टुडिओमध्ये दुनियादारीची संपूर्ण टीम सेलिब्रेशनसाठी हजर होती. सेलिब्रेशनच्या निमित्ताने सर्व कलाकारांनी शूटिंगच्या दरम्यान आलेले अनुभव ही कथन केले. मैत्रीच्या अनोख्या सेलिब्रेशनचे दर्शन घडवत प्रत्येकांनी शूटिंगच्या वेळचे धमाल किस्से, आठवणींना उजाळा दिला.
जितेंद्र जोशी यांनी दिग्दर्शक संजय जाधव यांचा दिलखुलासपणा आणि शूटिंगच्या सेटवर गिरवलेले शिस्तीचे धडे याविषयी सांगितलं. तर संजय जाधवबरोबर बारा वर्षांनी काम करायला मिळाल्याचा आनंद सुशांत शेलारने व्यक्त करत अभिनेता म्हणून जबाबदारी वाढल्याचेही कबूल केले. आयुष्य काय असते हे शूटिंगच्या निमित्ताने जगायला मिळाले असे सागंत सई ताम्हणकरने दिग्दर्शक संजय जाधव उत्तम अभिनेता असल्याचीही पावती दिली.
संगीतकार समीर साप्तिस्करनेही जुन्या गाण्याला नवी ट्रिटमेंट देण्याची सुचलेली कल्पना सांगत चित्रपटात असलेलं ते गाणं गाऊन सेलिब्रेशनचा झक्कास मूडच तयार केला. दिग्दर्शक संजय जाधव यांनी देखील चित्रपट चित्रिकरणाचा अनुभव शेअर करत आपण सगळयांना सांभाळून घेण्याऐवजी सर्व कलाकारांनीच आपल्याला सांभाळून घेतले, असं सांगून कलाकारांनी केलेल्या सहकार्याचे कौतुक केले.
चेकमट, रिंगरिंगा ,फक्त लढ म्हणा या चित्रपटानंतर दिग्दर्शक संजय जाधव ड्रिंमिंग टॅवेन्टीफोर सेव्हन या आपल्या निर्मिती संस्थेद्वारे हा चित्रपट घेऊन येत आहेत. अंकुश चौधरी,स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, संदीप कुलकर्णी, उदय सबनीस, उदय टिकेकर,सुशांत शेलार, उर्मिला कानिटकर, वर्षा उसगावकर, आणि सई ताम्हणकर यासारखे दिग्गज अभिनेते या चित्रपटात आहेत. से बॅण्डच्या समीर साप्तिस्कर, अमितराज, पंकज या त्रयींनी चित्रपटात जुन्या गाण्याला नवी ट्रिटमेंट देण्याचा एक आगळा प्रयोग केला आहे. एकंदरीतचं तरूणाईचा सळसळता उत्साह या चित्रपटात पाहायला मिळेल.