‘टॉम आणि जेरी’ नाटकाने जिंकली दुबईकरांची मने

नवरा बायकोची भांडणं या रोजच्या जीवनातल्या विषयाला कल्पकतेची फोडणी देत वेगळया पध्दतीनं मांडून प्रेक्षकांचे मनोरंजन करणा-या टॉम आणि जेरी या नाटकाने अल्पावधीत रसिकांची मने जिंकली.

खुसखुशीत पण अर्थपूर्ण संवाद, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि कसदार अभिनयाच्या जोरावर या नाटकाने मुंबई, पुणेसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी हाऊसफुल्ल प्रयोग सादर केले. यशाचा हा आलेख कायम ठेवत या नाटकाने दुबईमधील प्रेक्षकांचे मनोरंजन करीत त्यांचीही मने जिंकली आहेत. दुबईतील महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या या नाटकाला तेथील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

अव्दैत थिएटर्स निर्मित आणि ग्रेट मराठा एन्टरटेन्मेट प्रस्तुत निखिल रत्नपारखी दिग्दर्शित टॉम आणि जेरी नाटकामध्ये गोपाळ आणि दिपा या विवाहीत जोडप्याची आगळीवेगळी कथा मांडण्यात आली आहे. केवळ दोनच पात्रे असली तरीही वेगवान कथानक आणि सहज सुंदर अभिनय या जोरावर हे नाटक प्रेक्षकांना मनमुराद आनंद देऊन जाते.

महेश मांजरेकरांच्या ग्रेट मराठा एन्टरटेन्मेटची निर्मिती, नेपथ्य, लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी चौफेर कामगिरी करणारे निखिल रत्नपारखी, शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना तर मिलिंद जोशींच संगीत अशी उत्कृष्ट टिम टॉम आणि जेरीच्या यशामागे आहे.

Leave a Comment