एकतर्फी प्रेमातून बलात्कार आणि हत्या

फरीदाबाद: एकतर्फी प्रेमातून बारावीत शिकणाऱ्या युवतीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या विवाहीत नराधमाला पोलिसांनी जेरबंद केले. संतप्त जमावाने या आरोपीच्या घरावर दगडफेक करून त्याची दुचाकी पेटवून दिली.

फरीदाबाद येथील गांधी कॉलनी येथे राहणारी १६ वर्षीय युवती नेहेमीप्रमाणे संध्याकाळी ७ पर्यंत घरी न आल्याने तिच्या पालकांनी तिचा शोध घेऊन पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याबद्दल तक्रार दाखल केली. पावणे आठच्या सुमारास ब्लॉक ५ ई येथील एका गेस्ट हाऊसमध्ये या युवतीचा मृतदेह आढळून आला.

तिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशीरा सोनू नावाच्या भंगार व्यावसायिकाला अटक केली. त्याने आपले त्या युवतीवर मनापासून प्रेम होते; मात्र तिचे इतर काही मुलांशी संबंध असल्याचे समजल्याने आपण तिची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. सोनूने दुपारी साडेतीन वाजता या युवतीला गेस्ट हाऊसमध्ये बोलावून मद्यप्राशन केले आणि या युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर त्याने चाकूने भोसकून तिचा खून केला; असे सोनूने पोलिसांना सांगितले. सोनू विवाहित असून त्याला ३ वर्षाचा मुलगा आहे.

या घटनेबाबत माहिती पसरताच संतप्त नागरिकांचा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला. आरोपीचे नाव पत्ता कळतांच जमावाने त्याच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर जमावाने ३ तास नीलम चौक येथील रस्ता रोखून धरला. जमावातील काही जणांनी रस्त्यावरील वाहनचालकांना मारहाण केली. अखेर बळाचा वापर करून पोलिसांनी जमावाला काबूत आणले.