हेडलीचे भारतात हस्तांतरण होण्याची अजूनही शक्यता

वॉशिंग्टन दि.२५ – डेव्हीड हेडलीने तपासकामात अमेरिकन सरकारला सहकार्य करण्याचा तसेच सर्व खरी माहिती सांगण्याचा करार केला आहे. व त्यामुळेच भारत अमेरिकेत हस्तांतरण करार अस्तित्वात असूनही हेडलीचे भारताकडे हस्तांतरण होऊ शकलेले नाही. मात्र हा करार हेडलीने मोडला तर भारतात त्याचे हस्तांतरण होऊ शकते असे अमेरिकन अॅटर्नी जनरल गॅरी शॉपिगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

अमेरिकन नागरिक पण पाकिस्तानचे मूळ असलेला मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हीड हेडली याला शिकागो न्यायालयाने ३५ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात तसेच डेन्मार्क येथील वर्तमानपत्राच्या कचेरीवरील हल्यात आपला हात होता अशी कबुली हेडलीने दिल्यानंतरच त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. हेडलीने अमेरिकन सरकारशी केलेल्या करारानुसार त्याने केवळ अमेरिकनच नाही तर परदेशी सरकारकडून करण्यात येणार्या  गुन्ह्यांबाबतच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

त्यामुळे हेडलीने तपासकार्यात सहकार्य केले नाही अथवा चुकीची खोटी माहिती दिली तर हा करार रद्द होणार आहे आणि  भारताने मागणी केल्यास त्याचे हस्तांतरण भारताकडे होऊ शकेल असे गॅरी यांचे म्हणणे आहे.  हेडलीला सुनावण्यात आलेल्या शिक्षेत पॅरॉलची सुविधा नाही आणि किमान ८५ टक्के शिक्षा त्याला भोगावीच लागणार आहे असेही ते म्हणाले.

Leave a Comment