धर्माचा आणि भगव्याचा अपमान सहन करणार नाही: भाजप

नवी दिल्ली: हिंदू आणि हिंदू परंपरेला पूजनीय असलेला भगवा ध्वज याचा अवमान केल्यास यापुढे सहन केला जाणार नाही; असा इशारा भारतीय जनता पक्षाने दिले आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सतत उथळ विधाने करणारे उथळ गृहमंत्री आहेत; अशी टीकाही भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केली. शिंदे यांचे पद काढून घ्यावे आणि काँग्रेस अध्यक्षांनी माफी मागावी; या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला.

दरम्यान; मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावाचा म्होरक्या हाफीज सईद याने पाकिस्तानात पत्रकार परिषद घेऊन शिंदे यांची तारीफ केली. शिंदे यांनी सत्य कथन केले; असे सांगून शिंदे यांच्या विधानाला भारतीय माध्यमांनी ठळक प्रसिद्धी दिल्याबद्दल सईदने भारतीय माध्यमांचे आभार मानले. आजपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतो; असा आरोप करणार्‍या भारताच्या गृहमंत्र्यांनी केलेले सत्य कथन हा आम्ही अल्लाहचा आशिर्वाद समजतो; असेही सईद म्हणाला.

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भगव्या दहशतवादाला प्रोत्साहन देत असून त्यांच्याकडून दहशतवादी प्रशिक्षण केंद्र चालविली जात असल्याचा आरोप करून शिंदे यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. भारतीय जनता पक्षाने शिंदे यांचे हे विधान केवळ आक्षेपार्ह नाही तर धोकादायक असल्याची टीका केली.

भाजप आणि संघ हे हिंदू दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत; असा आरोप करून शिंदे म्हणाले की; भाजप आणि संघाकडून हिंदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जात असल्याचे गृह विभागाचे अहवाल असून या सगळ्या घडामोडींवर गृह विभागाची करडी नजर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. समझोता एक्स्प्रेस, मक्का मशीद आणि मालेगावमधील बॉम्बस्फोट ही भगव्या दहशतवाद्यांची कृत्ये असल्याचेही शिंदे म्हणाले.

Leave a Comment