नवी दिल्ली: पूर्ती घोटाळा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या दुसऱ्या टर्मच्या स्वप्नपूर्तीत अडथळा ठरण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेऊनही गडकरींच्या दुसऱ्या टर्मसाठी सर्वसहमती होत नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दि. २३ पर्यंत मुदत असून सहमती न झाल्यास दि. २४ रोजी मतदान होणार आहे.
मागील आठवड्यापर्यंत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि संघाचे उच्चपदस्थ यांनी अध्यक्षपदासाठी सर्वसंमत नाव निश्चित करण्याचे प्रयत्न केले. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी पक्ष प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांचे नाव पुढे केले. लोकसभेतील विरोधीपक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र त्या स्वत:च अध्यक्ष पदासाठी फारशा उत्सुक नाहीत; असेही सूत्रांनी सांगितले.
कोणत्याच नावावर सर्वसहमती होत नसल्याने गडकरी यांनाच दुसऱ्यांदा अध्यक्षपद देण्यात यावे; अशी अडवानी यांची मानसिकता झाली आहे. मात्र पूर्ती घोटाळ्यात अडकलेल्या गडकरींना पुन्हा अध्यक्ष करणे पक्षासाठी धोकादायक ठरेल; अशी अडवाणींसह अनेक नेत्यांची भावना आहे.