मुंबईत ४ वर्षीय बालिकेचा स्कूलबसमध्ये विनयभंग

मुंबई: राजधानीत धावत्या बसमध्ये युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची वेदना जागी असतानाच देशाच्या आर्थिक राजधानीत केवळ ४ वर्षाच्या बालिकेवरही धावत्या स्कूलबसमध्ये बलात्कार झाल्याच्या आरोपावरून रमेश राजपूत या बसच्या वाहकाला अटक झाली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. मात्र राजपूत याने या बालिकेवर बलात्कार केला नाही; तर विनयभंग केला आहे. त्याच्यावर चुकून बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचे स्पष्टीकरण जुहू पोलिसांनी दिले.

मंगळवारी दुपारी बसमधील सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडल्यानंतर रमेशने शेवटी राहिलेल्या जुहू येथे एका नामांकित नर्सरी स्कूलमध्ये शिकणार्‍या या मुलीचा बसच्या मागच्या आसनावर विनयभंग केला. या प्रकाराबाबत आपल्या पालकांना काही न सांगण्याची धमकीही त्याने दिली. या अनपेक्षित प्रकाराने भेदरलेल्या या मुलीने बुधवारी आपल्या आई, वडिलांना या प्रकाराबाबत माहिती दिली. तिच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली. व्यवस्थापनाने तिची वैद्यकीय तपासणी करून पोलीस ठाण्यात तक्रार केली.

या तक्रारीनुसार पोलिसांनी चालक आणि वाहकाला ताब्यात घेतले. मात्र चालकाने आपण गाडी चालवित असल्याने आपल्याला या प्रकाराबद्दल काहीच समजले नाही; असे पोलिसांना सांगितले.