वाद संपेनात

साहित्य संमेलन अनेक वादांच्या पार्श्वभूमीवर संपलेच पण काही वादांनी मंत्र्यांचीही पंचाईत करून टाकली. म्हणूनच समारोपाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजर राहिले नाहीत. नावे जाहीर होऊनही  ते न आल्याने तटकरे आणि तावडे यांच्या उपस्थितीत समारोप करावा लागला. त्यांनी एकमेकांना बोचकारे काढले. दोघेही साहित्यावर काही बोलले नाहीत. राजकारणी लोकांना संमेलनात काही स्थान असावे की नाही यावर अनेक वर्षे वाद जारी आहे. आता संमेलनाचा खर्च वाढत चालला आहे त्यामुळे नेते संमेलनात अपरिहार्य ठरले आहेत. तसा हा वाद मिटला आहे पण नेते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येऊनही राजकीय उणीदुणी काढत असतील तर त्यांना तिथे बोलवायचे कशाला ?

या संमेलनात अनेक वाद झाले पण समारोपाचा कार्यक्रमही अध्यक्षाच्या भाषणातील वादग्रस्त मजकुराने गाजला. नागनाथ कोत्तापल्ले बरेच आक्रमकपणे बोलले. त्यांनी निदान आगामी काही संमेलनातले काही वाद मिटावेत असे एक मार्गदर्शक सूत्र सांगितले. ते बरे झाले. खरे तर साहित्य संमेलन हे संयोजकांनी भरवलेले असते पण ते साहित्य महामंडळाचे असते. निमंत्रण पत्रिकेवर आणि अन्य सर्व छापील मजकुरात, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे साहित्य संमेलन असे आवर्जून म्हटलेले असते. मग असे असेल तर साहित्य संमेलनात कसलेही वाद उपस्थित होऊ नयेत याबाबत महामंडळानेच दक्ष रहायला हवे.

या संमेलनात परशुरामावरून जो काही गोंधळ झाला तो महामंडळाने दक्षता न घेतल्यानेच झाला. आता तरी महामंडळाने अशी काही मार्गदर्शक सूत्रे तयार करावीत पण त्या ऐवजी अध्यक्षांनीच संमेलनात धार्मिक प्रतिके वापरू नयेत असे म्हटले. ते बरेच झाले.  संमेलन सेक्युलर असावे असे त्यांनी प्रतिपादन केले. साहित्य महामंडळ हे  मराठी भाषक संस्थांचे महामंडळ आहे. महाराष्ट्रातली चार मंडळे तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातली चार मंडळे अशा या आठ मंडळांचे हे महामंडळ असते आणि आजवरचा अनुभव असा आहे की या महामंडळावर पदाधिकारी म्हणून निवडून येणारे लोक साहित्यातले जाणकार असतातच असे नाही. काही वेळा तर या महामंडळावर असे लोक असतात की ज्यांची नावे कोणी ऐकलेलीही नसतात. त्यामुळे ते महामंडळाचे प्रतिनिधी म्हणून मिरवतात  पण मराठी भाषकांच्या या अपूर्व महोत्सवाचे वैचारिक स्वरूप ठरवण्याची कुवत त्यांच्यात नसते.

संमेलनाला जोडून होणार्याण वादाला तेही एक कारण आहे. आता अध्यक्षांनी महामंडळाची जबाबदारी आपल्या शिरावर घेत का होईना पण धार्मिक प्रतिके असता कामा नयेत असे म्हटले ते बरे झाले. त्यांनी एका बाजूला  वाद संपवण्याची भूमिका घेतली पण लक्ष्मण माने यांचा संदर्भ घेऊन त्यांना चांगलेच झोडपून काढले कारण माने यांनी कोत्तापल्ले यांना संमेलनाला न जाण्याचा इशारा दिला होता. कोत्तापल्ले हे संमेलनाला जाणार असतील तर आपण त्यांचे भाषण उधळून लावू अशी धमकी त्यांनी दिली होती. आम्ही म्हणतो तसे करा नाही तर उधळून लावू अशी ही भाषा झुंडशाहीची आहे. खरे तर माने यांच्याकडे तशीही काही ताकद नाही. पण त्यांच्या या इशार्या ने कोत्तापल्ले दुखावले आणि त्यांनी माने यांना जोरदार टोमणा मारला.

लक्ष्मण माने यांना पद्मश्री पदवी मिळाली आहे पण ती वादग्रस्त ठरली आहे. तसे माने हे चांगले लेखक आहेत. त्यांचे उपरा हे आत्मकथन चांगलेच गाजले आहे आणि त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या आत्मकथनाने मराठी साहित्याच्या दालनात भटक्या विमुक्तांच्या व्यथा बोलक्या झाल्या. मात्र त्यांना मिळालेली पद्मश्री अनपेक्षित होती. त्यांच्या पेक्षाही श्रेष्ठ आणि ज्येष्ठ साहित्यिक या पदवीला मुकले आहेत आणि त्यांना मध्येच ती मिळाली आहे. कोणाला एखादी पदवी मिळाली तर त्यात कोणाला वाईट वाटायचे काही कारण नाही पण त्यांच्या या पदवीचा आणि त्यांच्या शरद पवार यांच्याशी असलेल्या जवळीकीचा संबंध जोडला गेला.

आता त्यांनी कोत्तापल्ले यांचे भाषण उधळून लावण्याचा इशारा देऊन कोत्तापल्ले चिडले आणि त्यांनी माने यांना पुढार्यां च्या मागेपुढे फिरून पदव्या मिळवत नसतो असा जमालगोटा लगावला. माने यांनी नंतर खुलासा करताना आपण कोत्तापल्ले यांना परशुराम कोण होता याची आठवण ठेवा असे म्हटले होते अशी सारवासारव केली पण आधी तसेच म्हटले असते आणि उधळून लावण्याची भाषा टाळली असती तर त्यांना हा अपमान टाळता आला असता. अतिरेकी भाषेमुळे सत्य मुद्दाही लोकांच्या गळी उतरत नाही. आता माने शहाणे होतील आणि आपले म्हणणे मांडण्यासाठी उधळून लावण्याची भाषा न वापरता सौम्य भाषा आणि ठोस युक्तिवाद करतील अशी आशा करू या. माने यांनी कोत्तापल्ले यांना परशुरामाची आठवण करून दिली तशी त्यांनी ती शरद पवारांना काही दिली नव्हती हेही या ठिकाणी नमूद करावेसे वाटते.

Leave a Comment