नाशिक दि. १२ -येत्या १८ जानेवारीला नाशिक येथे होत असलेल्या नामको बँकेच्या नव्या प्रशासकीय कार्यालयाच्या भूमीपूजन समारंभात भाजप अध्यक्ष नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याच वेळी ज्येष्ठ संचालक हुकुमचंद बागमार यांच्या पंच्याहत्तरीचाही कार्यक्रम केला जाणार असून त्यातही हे दोघे नेते सहभागी होणार आहेत असे समजते. गडकरी आणि राज ठाकरे एकत्र कार्यक्रमात उपस्थित राहात असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भाजप मनसे हातमिळवणीची चर्चा रंगू लागली आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत दहा वर्षे युतीत सत्ता भोगलेल्या भाजपने गेल्या वर्षी मात्र शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मनसेशी हातमिळवणी केली होती. तेव्हापासूनच आगामी विधानसभा निवडणुकांत नवी राजकीय समीकरणे जुळतील अशी अटकळ तज्ञ बांधत होते. त्यातही मनसे आणि भाजप युतीची जोरदार चर्चा केली जात होती. राज आणि नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना पण एकाच व्यासपीठावर उपस्थित राहण्याच्या घटनेने विरोधी पक्षांत मात्र चलबिचल सुरू झाली असून विरोधी पक्ष अधिक सावध झाला आहे. राज- नितीन यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजरही विरोधी पक्ष ठेवत असल्याचे अंतर्गत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.