पुणे दि.१० – येथील येरवडा कारागृहाच्या खुल्या जेलमधून खूनाच्या आरोपावरून शिक्षा भोगत असलेला कैदी पळून गेला असल्याचे कारागृहाच्या अधिकार्यांुनी जाहीर केले असून तशी तक्रार येरवडा पोलिस चौकीत दाखलही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जेव्हा हा कैदी पळाला तेव्हाच राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील दौलतराव जाधव जेल अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाच्या १०० व्या पासिंग आऊट परेडसाठी जेल आवारात उपस्थित होते.
जेल अधिकार्यां्कडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सतीश बाजीराव दसपुते हा अहमदनगर येथील कैदी खुल्या कारागृहात कामासाठी गेला तेव्हा साडेसात वाजता सुरू झालेल्या त्यांच्या पाळीत ११८ कैदी होते. हवालदार बाळासाहेब पुंड यांनी जेव्हा साडेबाराच्या सुमारास या कैद्यांची हजेरी घेतली तेव्हा सतीश त्यात नसल्याचे लक्षात आले. ताबडतोब जेलच्या व आसपासच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला मात्र तो सापडला नाही. याच वेळी पासिंग आऊट परेडही सुरू होती.
खुनाच्या आरोपावरून शिक्षा भोगत असलेला दसपुते २००७ मध्येही पॅरोलवर सुटला होता तेव्हाही तो वेळेत परत न आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्याला खुल्या कारागृहात पाठविण्यात आले होते. आता तेथूनही त्याने पलायन केले आहे.४५ वर्षीय दसपुते अहमदनगर जिल्ह्यातील आहे.