पाकिस्तानची आगळीक

पाकिस्तानी जवानांनी काल भारत पाक सीमेवरील पूंछ भागामध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेचा भंग करून  भारतीय हद्दीत घुसून भारतीय जवानांवर हल्ला चढविला. त्या हल्ल्यात राजस्थान रेजिमेंटचे दोन जवान शहीद झाले. पाकिस्तानी जवानांनी एक तर ताबा रेषा ओलांडून आत येऊन हल्ला केला ही गोष्ट निषेधार्ह आहेच परंतु जे जवान मारले गेले त्यांच्या मृतदेहांची त्यांनी अमानवी पध्दतीने विटंबना केली.

युध्दे कितीही निर्दयपणे लढली जात असली आणि त्यात क्रौर्याची कितीही परिसीमा गाठली जात असली तरी जवानांच्या मृतदेहाच्या बाबतीत काही लिखीत आणि अलिखीत नियम आहेत. त्यानुसार आपला शत्रू हा कितीही कट्टर शत्रू असला तरी त्या शत्रू सैन्यातील शहीद जवानांच्या मृतदेहाची विटंबना करता कामा नये. असे मानले जाते आणि माणुसकीच्या भूमिकेतून जवानाच्या मृतदेहाला सन्मानाची वागणूक दिली जाते. एवढेच नव्हे तर अनेकदा कितीही तणावाचे वातावरण असले तरीही मृतदेहांची अदलाबदलसुध्दा केली जाते.

परंतु पाकिस्तानी जवानांनी काल आपल्या अमानवी वर्तनाचे दर्शन घडवीत भारताच्या या दोन शहीद जवानांच्या मृतदेहाची नुसती विटंबनाच केली असे नाही तर मरण पावल्यानंतर त्यांची शीर कापून ते आपल्या बाजूला नेले. याचा जगभरातून निषेध झाला पाहिजे. कारण भारताची काही चूक नसताना. पाकिस्तानने ही आगळीक केली आहे. १९९९ साली झालेल्या कारगिलच्या युध्दामध्येही पाकिस्तानच्या नृशंस सैन्यांनी भारताच्या सात जवानांना पकडून त्यांच्या देहाची अतिशय क्र्रूरपणे आणि जिवंत अवस्थेत भयानक विटंबना केली होती.

पाकिस्तानी जवान आणि नेते भारताशी वरवर कितीही मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याबाबत गोडगोड बोलत असले तरी ते मनातून भारताचा प्रचंड द्वेष करतात आणि त्यांचा तो मनातला द्वेष अशा कृत्यातून व्यक्त होत असतो. आंतरराष्ट्रीय संकेतानुसार मृतदेहांना वागणूक न देता त्यांचा शिरच्छेद करण्याचा हा राक्षसी प्रकार केल्याबद्दल पाकिस्तानच्या कोणत्याच जवानाला काही शिक्षा झालेली नाही आणि होणारही नाही. कारण त्यांच्या लेखी तो अपराध नाहीच. म्हणूनच या हल्ल्याचा आणि या अमानुष प्रकाराचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे.

वास्तविक पाहता २००३ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात करार होऊन युध्दबंदी जाहीर झाली होती. जवळपास दहा वर्षांपासून भारताकडून ही युध्दबंदी कसोशीने पाळली गेली आहे. परंतु गेल्या दोन तीन महिन्यात पाकिस्तानची शेपटी फार वळवळ करायला लागली आहे. गेल्या वर्षीच्या जून जुलै महिन्यात अशा प्रकारे कृष्णा घाटी भागात पाकिस्तान्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यात भारताचा एक जवान मारला गेला. २००३ नंतर अशा प्रकारे झालेला हा पहिलाच गोळीबार होता. परंतु या घटनेनंतर सहा महिन्यांनी पुन्हा एकदा पकिस्तान्यांनी आपली खोडी काढली आहे. तिचा जाब पाकिस्तानला विचारला गेलाच पाहिजे.

पाकिस्तानी जवान भारतीय हद्दीमध्ये असा गोळीबार अनेकदा करत असत. लष्कर ए तैय्यबासारख्या दहशतवादी संघटनांचे हस्तक भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्यावर भारतीय जवानांनी गोळीबार करू नये यासाठी त्यांना संरक्षण म्हणून पाकिस्तानी जवान असा अंदाधुंद गोळीबार करत असतात. सोमवारी रात्री पुंछ विभागात प्रचंड धुके पसरलेले होते आणि त्या धुक्याचा गैरफायदा घेऊन काही दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असावेत आणि त्यासाठी या जवानांनी गोळीबार केला असावा असा अंदाज आहे.

अर्थात पाकिस्तानचे वैशिष्ट्य असे की अशा प्रकारची खोडी काढून सुध्दा पाकिस्तान आपला अपराध कधी मान्य करत नाही आणि त्याच्या नेहमीच्या पध्दतीनुसार काल पाकिस्तानच्या लष्कराने आपल्या या गोळीबाराचे समर्थनच केले. आधी भारतियांनी हल्ला केला होता आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून आपल्या सैन्यांनी गोळीबार केला. अशी सारवासारव पाकिस्तानच्या लष्कराने केली आहे. वास्तविक खोडी त्यांनीच काढली होती. तिला प्रत्युत्तर भारतीय जवानांनी दिले. त्यात पाकिस्तानचाही एक जवान मारला गेला आहे. भारतीय जवान भारत-पाक सीमेवर कधीच आक्रमकपणे असे हल्ले करत नाहीत. ती पाकिस्तानचीच रीत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या या सारवासारवीला काही अर्थ नाही.

पाकिस्तानच्या अशा चिथावणीखोर वर्तनाचा जाब त्याला विचारला गेला पाहिजे. पाकिस्तानमधून फूस देऊन भारतात दहशतवादी पाठविले जातात आणि ते भारतात येऊन घातपाती कारवाया करतात. या कारवायांना अलीकडच्या काळात बराच प्रतिबंध झालेला आहे आणि भारतात अशांतता निर्माण करण्याची संधी पाकिस्तानला मिळत नाही. त्यामुळे पाकिस्तान सरकार, आयएसआय संघटना आणि तिथल्या दहशतवादी संघटना यांच्यात नैराश्य पसरले आहे आणि त्या नैराश्याचा एक भाग म्हणून अशा प्रकारचे भ्याड हल्ले पाकिस्तानकडून केले जात आहेत.

Leave a Comment