महिला विषयक कायद्यांचे पुनरावलोकन हवे: स्वराज

नवी दिल्ली: महिलांना अधिक सुरक्षितता प्रदान करणारे कठोर कायदे करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीचा लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी पुनरुच्चार केला. महिला सबलीकरणासाठी असलेल्या सर्वच कायद्यांचे पुनरावलोकन करून अधिक सक्षम कायदे अमलात आणण्याचे काम नव्या वर्षात केले जावे; अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणात बळी पडलेल्या २३ वर्षीय युवतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेत स्वराज बोलत होत्या.

महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांसाठी आपण विशेष अधिवेशनाची मागणी केली. सर्वपक्षीय बैठकीचीही मागणी केली. मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या दोन्ही मागण्यांना वाटण्याच्या अक्षता लावल्या; अशी टीका करून स्वराज यावेळी म्हणाल्या की; संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविले जाणार नसेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलाविषयक कायद्यांचे पुनरावलोकन होणे आवश्यक आहे.

बलात्कारित अथवा अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेचा खून करण्यात आला किंवा या अत्याचारामुळे तिचा मृत्यू झाला तर आरोपीला देहांत शासन मिळावे; यासाठी आपण फेब्रुवारी २०११ मध्येच खाजगी विधेयक मांडले आहे; असेही स्वराज यांनी सांगितले.

Leave a Comment