कार्यक्षम नेत्यांचे स्वागत व्हावे

नरेन्द्र मोदी यांनी भाजपाला सत्तेवर आणले पण त्यांच्या या यशाचे रहस्य काय यावर अनेक लोक अनेक प्रकारे बोलत असतात. भाजपाचे नेते तर आपापल्या परीने मोदी यांची स्तुती करीतच असतात पण काही वेळा इतर पक्षांचे नेतेही मोदी यांच्या कार्याचे कौतुक करीत असतात. मागे एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्याच बैठकीत मोदी हा विषय निघाला होता. मोदी कसे तडफेने काम करतात, असा उल्लेख कोणी तरी केला आणि एका मागे एक मंत्री मोदी गायला लागले. अजित पवार यांना काही हे सहन होईना कारण तडफेने काम करावे तर आपणच असा त्यांचा दावा असतो. म्हणून ते चिडले आणि रागावून म्हणाले, निर्णय घेण्याचे सगळे अधिकार मोदी यांनाच आहेत, असे अधिकार असले की वाटेल ते करता येते.

अर्थात त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही असे नाही. मोदी यांना निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आहेत. आहेत म्हणजे त्यांनी ते खेचून घेतले आहेत. मात्र या अधिकारात ते करतात ते काम निर्दोष असते. त्यात त्यांचे काहीही कमीशन नसते आणि ते काम वेगाने होते. ते तसे होत नसेल तर ते त्यात स्वतः लक्ष घालतात आणि ते वेगाने होईल याची दक्षता घेतात.
   
काँग्रेसच्या काही नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात  मोदी यांच्या विकासातल्या काही प्रतिकूल बाबींवर प्रकाश पाडला होता. मुळात त्यांनी विकास केलेलाच नाही. गुजरात हे काँग्रेसच्या ताब्यात असल्यापासूनच प्रगत राज्य आहे. मोदी यांनी त्यात काही प्रमाणात भर घातली तर त्यात काही नवल नाही असे या नेत्यांचे म्हणणे होते. शिवाय आताही मोदी यांनी फार वेगाने विकास केला आहे यातही तथ्य नाही. कारण विकासासंबंधीचे काही आकडे पाहिल्यास महाराष्ट्र पुढे असल्याचे उघडपणे दिसते. असे असतानाही मोदींचे एवढे कौतुक का ? 

आता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोदी यांची स्तुती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या एका कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. मोदी यांनी आपल्या कामातून यश मिळवले आहे असे पटेल म्हणाले.  गुजरात निवडणुकीत पटेल समाज मोदी यांच्यावर नाराज होता असा प्रचार सातत्याने करण्यात आला होता. त्यातूनच केशुभाई पटेल यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि पटेल समाजाला मोदी यांच्यापासून फोडण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यात त्यांना काही यश आले नाही हे खरे.
आता राष्ट्रवादीतले पटेल मोदी यांची स्तुती करीत आहेत. एखाद्या नेत्याने पक्षाच्या सीमा ओलांडून अशी काही प्रशस्ती केली की त्यामागे काही हेतू आहे का याचा  शोध घेतला जातो. मग मोदी आणि शरद पवार यांच्यात काही एकत्र येण्याच्या सूप्त हालचाली सुरू आहेत का याचा कोणी शोध घ्यायला लागतो पण तसे अंदाज कोणी करू नयेत म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी लगेच खुलासा केला आहे आणि आपला या मागे काही राजकीय हेतू  नाही असे स्पष्ट केले आहे.

म्हणजे एकंदरीत सर्वांनी केवळ मोदी यांच्या बाबतीतच नव्हे तर सर्वांच्या बाबतीत असेच धोरण आखायला काय हरकत आहे ? नेता कोणताही असो त्याची कार्यक्षमता महत्त्वाची समजावी. कारण ती कार्यक्षमता हीही देशाची संपत्ती असते. चांगले, कार्यक्षम आणि विकासाचा दृष्टीकोन असलेले नेते फार दुर्मीळ असतात. सर्वांनाच ती जमत नाही. असे नेते उदयाला येत असतील तर ते कोणत्याही पक्षात असोत त्यांचे स्वागत झाले पाहिजे. आपण काही राज्यांत असे पाहतो की काही नेते खरोखरच चांगले असतात. केन्द्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचेच उदाहरण घेता येईल. ते विलक्षण कार्यक्षम प्रशासक आहेत. ते एखाद्या खात्याची सूत्रे हाती घेतात तेव्हा त्याला वाहून घेतात आणि काही महिन्यातच परिणाम दाखवून देतात.

चिदंबरम यांनी गृह खात्यात येताच या खात्याला अशी काही शिस्त लावली होती की, पाकिस्तानी अतिरेक्यांचा उपद्रव कमी झाला होता. असे कार्यक्षम मंत्री सगळ्याच पक्षात आहेत. आज मोदी यांची जशी स्तुती चालली आहे तशी पूर्वी नितीन गडकरी यांची झालेली होती. त्यांनी महाराष्ट्रात रस्ते बांधणीचे काम फारच कार्यक्षमतेने केले होते. त्यांना गडकरी म्हणण्याऐवजी रोडकरी म्हटले जात होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज  चव्हाण यांची सुरूवातीला सावकाश काम करणारे नेते म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.

अजित पवार हे सशाच्या वेगाने काम करतात त्यामुळे चव्हाण हे पवारांच्या स्पर्धेत टिकतात की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता पण, आता असे दिसायला लागले आहे की पृथ्वीराज चव्हाण यांचे कासव अजित पवारांच्या सशापेक्षा वेगाने धावत आहे. अशा निष्कलंक मुख्यमंत्र्याला सर्वांनी समर्थन दिले पाहिजे. आपला देश सध्या अकार्यक्षम नेत्यांच्या तावडीत सापडला आहे. त्याला कार्यक्षम नेत्यांची गरज आहे. ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांना सर्वांनी उचलले पाहिजे. कार्यक्षम, प्रशासन कुशल नेतेच देशाला पुढे नेऊ शकतात.  

Leave a Comment