दररोज दोन कप गाईचे दूध वाढत्या वयातील मुलाना दिले गेले तर त्यांच्या रक्तात डी व्हीटॅमिन आणि लोहाचे प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यास मदत मिळते असे नव्या संशोधनातून उघड झाले आहे. बालरोगतज्ञ जोनाथन मॅग्यरे यांनी हे संशोधन केले आहे. त्यासाठी त्यांनी २ ते ५ वयोगटातील १३०० मुलांचा सतत दोन वर्षे अभ्यास केला.
मुलांना रोज दोन कप गाईचे दूध देणे फायदेशीर
याविषयी अधिक माहिती देताना जोनाथन म्हणाले की मुलाना नक्की किती दूध दिले पाहिजे याविषयी पालकांना नक्की माहिती नसते. खरेतर वैद्यकीय क्षेत्रातही मुलांना नक्की किती दूध दिले गेले पाहिजे हे कुठेच स्पष्ट केले गेलेले नाही. त्यामुळे मी हे संशोधन हाती घेतले. त्यात १३०० बालकांचा समावेश करण्यात आला. कांही जणांना जादा दूध दिले गेले तर बाकी बालकांना दोन कप दूध दररोज दिले गेले. त्यानंतर केलेल्या तपासण्यात असे आढळले की जादा दूध दिले गेले होते त्यांच्या रक्तात डी व्हीटॅमनचे प्रमाण अधिक होते पण लोहाची पातळी घसरलेली होती. ज्यांना दोन कप दूध दिले गेले होते त्यांच्यात मात्र हे प्रमाण अगदी योग्य होते. या प्रयोगासाठी पालकांकडून प्रश्नसंचावली भरून घेण्यात आली होती.
या संशोधनातून असेही आढळले की ज्या मुलांचा रंग काळा किवा डार्क आहे ती हिवाळ्यात डी व्हीटॅमिन जास्त प्रमाणात साठवू शकत नाहीत. त्यामुळे हाडांचे आरोग्य धोक्यात येते. ज्यांच्यात लोहाची पातळी कमी असते ती मुले अॅनिमियाची शिकार बनतात व त्यांची वाढ खुंटते. कॅनेडियन बालरोगतज्ञ संघाने मात्र बालकांना गाईचे दूध मुल १ वर्षाचे झाल्यानंतरच सुरू करावे अशी शिफारस केली आहे.
