दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण

नवी दिल्ली: सामुहिक बलात्काराच्या विरोधातील लोकक्षोभ रविवारी हिंसक बनला. पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देत आंदोलकांनी आंदोलनाला हिंसक रूप दिल्याने. अखेर पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठीमार करून परिस्थिती काबूत आणली. दिल्लीत जमावबंदीही लागू करण्यात आली आहे.

तब्बल एक आठवड्यापर्यंत शांततेने चाललेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी इंडिया गेट जवळ पोलिसांनी उभारलेले वॉच टॉवर जाळले आणि रस्त्यावरील काही वाहनांची मोडतोड केली. पोलिसांनी लाठीमार करून आंदोलकांना पिटाळून लावले. योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर आंदोलकांना चीथावाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राजपथ आणि विजय चौक येथेही पोलिसांना बलाचा वापर करावा लागला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सुरू केलेल्या आणि शांततेने चाविलेल्या या आंदोलनात राजकीय पक्षाचे कार्यकर्ते घुसल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे.

राजधानीत घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या गंभीर गुन्ह्याबाबत केंद्र शासन कठोर पावले उचलत असून या प्रकारच्या निषेधार्थ देशभरात होणारी निदर्शने थांबवावी असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. या युवतीला आवश्यक ते सर्व उपचार उपलब्ध करून दिले जातील; तसेच तिला त्वरित न्याय मिळवा यासाठी सरकार या खटल्याची दैनंदिन सुनावणी व्हावी; अशी विनंती न्यायालयाला करेल; असेही शिंदे यांनी सांगितले.

राजधानीच्या रस्त्यावर धावणाऱ्या बसमध्ये युवतीवर झालेल्या सामुहिक बलात्कारामुळे देशभरात क्षोभ उसळलेला असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना यापुढे अशा प्रकारची घटना घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही गृहमंत्र्यांची भेट घेऊन सुरक्षा व्यवस्था काटेकोर करण्याच्या सूचना दिल्या.

या अघोरी बलात्काराच्या निषेधार्थ निदर्शने करणार्‍या युवकांची कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी भेट घेऊन या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आश्वसन दिले. ज्येष्ठ समजसेवक अण्णा हजारे यांनीही कायदे अधिक कडक करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment