महेंद्रसिंग धोनी गेल्या काही दिवसापासून चांगलाच फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे येत्या काळात त्याचे कर्णधार पद राहणार की जाणार याबाबत बीसीसीआय लवकरच निर्णय घेणार असल्याचे समजते. याचा फटका मात्र धोनीला अतापासूनच बसण्यास सुरुवात झाली आहे. जाहिराती मधील धोनीची पत मात्र दिवसागणिक घसरत चालली आहे. पाच मोठया कंपन्यांनी त्याच्या सोबतचा करार संपविला असल्याचे समजते. दुसरीकडे टीमच्या खराब प्रदर्शनामुळे धोनीला हटवावे या मागणीने मात्र सध्या जोर धरला आहे. त्यामुळे धोनी आता चांगलाच अडचणीत सापडला आहे.
धोनीच्या या फ्लॉप कामगिरी नंतर डेटा रिसर्च आणि मीडिया ट्रॅकिंग एजन्सीने एक सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये याचा फटका धोनीला बसण्यास सुरुवात झाली असल्याचे पुढे आले आहे. यावर्षी २२ कंपन्यांनी धोनीला आपल्या जाहिरातीत दाखवले. गेल्यावर्षी तो २७ कंपन्यांच्या जाहिरातीत चमकला होता. गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचे प्रदर्शन सातत्याने खालावत चालले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर मायदेशी झालेल्या सामन्यातही इंग्लंडने टीम इंडियाला चारी मुंड्या चित केले आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात बीसीसीआय धोनीला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय घेतला तर त्याची ब्रँड व्हॅल्यू ३०-३२ टक्क्यांनी कमी होणार आहे. सर्वात जास्त कमाई असलेल्या भारतात खेळाडूंमध्ये धोनी गेल्या काही दिवसापासून नंबर एकवर आहे. तो प्रत्येकवर्षी जाहिरातीतून ७० ते ८० कोटी रूपयांची कमाई करत होता. मात्र आता येत्या काळात या सर्व गोष्टीचा फटका बसणार आहे.’