राष्ट्रवादीच्या हायटेक कायालयाचे २८ डिसेंबरला उद्घाटन

मुंबई दि.१३ – काँग्रेसमधून फूटून बाहेर पडल्यावर १९९९ साली शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भव्य दिव्य आणि पूर्ण नूतनीकरण केलेल्या मुख्यालयाचे उद्घाटन २८ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडून समजते. विशेष म्हणजे २८ डिसेंबर हा काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. अर्थात हा केवळ योगायोग असल्याचेही या नेत्यांचे म्हणणे आहे.

फ्री प्रेस जर्नल रोडवरील हे कार्यालय अत्यंत हायटेक करण्यात आले असून हे कार्यालय पेपरलेस असेल. राजकीय पक्षांचे कार्यालय पेपरलेस असण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ आहे. वाय फाय कनेक्टीव्हीटी आणि उत्तम दर्जाची संदेशवहन उपकरणे यांनी हे कार्यालय परिपूर्ण असून नूतनीकरणाचे सर्व काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सल्ल्यानुसार केले गेले असल्याचेही समजते. या आलिशान कार्यालयात नेत्यांसाठी प्रशस्त दालने, दोन बैठक हॉल आहेत आणि त्यांचे इंटिरिअर अतिशय उत्तम केले गेले आहे.त्यासाठी नक्की किती खर्च आला हे समजू शकले नसले तरी साधारण १ कोटी रूपये यावर खर्च केले गेले आहेत असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या कार्यालयाचे उद्घाटन यापूर्वीच म्हणजे ९ डिसेंबरला करण्यात येणार होते. हा दिवस काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा जन्मदिवस आहे. मात्र हे उद्घाटन शरद पवार यांना वेळ नसल्याने पुढे ढकलण्यात आले असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनाही आपल्या पक्षाचे कार्यालय याच धर्तीवर नूतनीकरण करण्याचा विचार करत आहे असे समजते. शिवसेनेचे शिवालय हे कार्यालय राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळच आहे.

Leave a Comment