मायावतींनी घेतला राज्यसभा अध्यक्षांशी पंगा

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती अमीद अन्सारी आपले कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरत असल्याचा आरोप करून बहुजन समाज पक्षाच्या सदस्यांनी राज्यसभेचे कामकाज बंद पाडले. शासकीय नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती- जमाती आणि आदिवासींना बढतीत आरक्षण देण्याचे विधेयक संमत करण्यासाठी सरकारला इशारा देणारे आपले हे पहिले कडक पाऊल असल्याचा इशाराही बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दिला आहे. दरम्यान; पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अन्सारी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली.

गेल्या काही दिवसापासून राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ नंतर चालू शकलेले नाही; याकडे लक्ष वेधून बुधवारचे कामकाज सुरू होताच मायावती म्हणाल्या की; सभागृहाचे कामकाज सुरळीत चालेल याची दक्षता घेणे ही अध्यक्षांची जबाबदारी आहे. मात्र काही दिवसापासून दुपारी १२ नंतर अध्यक्ष सभागृहात दिसताच नाहीत; अशी टीकाही मायावती यांनी केली.

मायावतींच्या या अनपेक्षित हल्ल्याने हबकून गेलेले अन्सारी यांनी मायावतींना सहकार्याचे आवाहन केले. ‘आपण सभागृहाच्या ज्येष्ठ सदस्य आहात. सभागृहाचे काम सर्वांच्या सहकार्यानेच चालते. सध्या कामकाज सुरू आहे. ते सुरळीत सुरू राहावे यासाठी अप सहकार्य करा.’ मात्र मायावती आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या आवाहनाला दाद दिली नाही. बसपाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करून अध्यक्षांना कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले.

रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीवर झालेल्या मतदानात सरकारच्या तारणहार ठरलेल्या बसप आणि समाजवादी पक्ष यांच्यात बढतीत आरक्षणाच्या मुद्द्यावर टोकाचा विरोध आहे. आरक्षणाचे विधेयक मांडून संमत करावे यासाठी बसप आक्रमक आहे; तर हे विधेयक मंजूर होऊ नये; यासाठी सप सरकारला धमकावित आहे. त्यामुळे सरकारची मात्र कोंडी झाली आहे.

Leave a Comment