सेवाकर विभागाने केले किंग फिशरचे विमान जप्त

मुंबई: सेवाकर विभागाच्या थकबाकीसाठी वारंवार नोटीस बजावूनही कर्जाच्या विळख्यात जखडलेल्या किंग फिशरने थकबाकी चुकती न केल्याने सेवाकर विभागाने कंपनीचे एक विमानच जप्त केले आहे.
किंग फिशर कंपनीकडे सेवाकराची ७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल होत नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

किंग फिशर तब्बल ७ हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या विळख्यात आहे. दैनंदिन खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन चुकते करण्यासाठीही निधी उपलब्ध नसल्याने कंपनीच्या विमानांची उड्डाणे बंदच आहेत. ऑक्टोबर महिन्यात नागरी उड्डयन संचालनालयाने कंपनीचा परवानाच रद्द केला.

मात्र; याच वेळी किंग फिशरचे मालक विजय मल्ल्यांना आणि कंपनीला दिलासा देणारी एक बातमी म्हणजे अबुधाबी येथील विमान उड्डाण कंपनी ‘इतिहाद’ किंग फिशरचे ४८ टक्के समभाग विकत घेण्यास तयार झाली असून या महिन्यात इतिहाद ३० टक्के आणि उरलेले १८ टक्के समभाग पुढील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात खरेदी करणार आहे.