अफजल गुरूला गुरुवारी फाशी द्या: भाजपची मागणी

नवी दिल्ली: संसदेवरील हल्ल्यात सहभागाबाबत फाशीची शिक्षा सुनाविलेल्या अफजल गुरूला या हल्ल्याच्या ११व्या स्मरणदिनी फाशीवर चढवावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी केली आहे.

सन २००१ साली दि. १३ डिसेंबर रोजी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना १० शस्त्रधारी दहशतवादी व्हीआयपी स्टीकर असलेल्या गाडीतून संसदेत घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दहशतवादी ठार झाले. या हल्ल्यात नऊ जन ठार झाले तर १६ जखमी झाले.

या हल्ल्याच्याच दिवशी या कटात सहभागी असलेल्या अतिरेक्याला फासावर चढविणे हीच या हल्ल्यातील शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल; असे मत हुसेन यांनी व्यक्त केले.

गुरूला सन २००४ मध्ये फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली असून त्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. या अर्जाबाबत संसदेचे अधिवेशन संपल्यावरच निर्णय घेतला जाईल; असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

Leave a Comment