जातीय दंगली आणि राजकारण

गुजरातला जातीय दंगलींची पार्श्वभूमी आहे. आहे म्हणण्यापेक्षा होती असे म्हणावे लागेल. २००२ सालपर्यंत गुजरातमध्ये दरसाल कधी ना कधी, कोठे ना कोठे जातीय दंगली होतच असत. अहमदाबाद शहराच्या कालुपूरसारख्या भागामध्ये वर्षात एखादी छोटी-मोठी दंगल नक्कीच व्हायची. दंगल पेटणे, जाळपोळ, काही लोकांच्या हत्या आणि संचारबंदी असा क्रम कायम जारी असे. २००२ साली तर गुजरातमध्ये मोठीच दंगल झाली. त्यामध्ये हजार लोक मारले गेले. गुजरातच्या औद्योगिक पट्ट्यातील काही शहरे जवळपास आठवडाभर दंगलींच्या ज्वाळांनी होरपळून निघाली होती.

अयोध्येवरून कारसेवा करून परत येणार्या् भाविकांना गोध्रा रेल्वे स्थानकावर त्यांचा डबा पेटवून देऊन जाळून मारण्यात आले होते. त्याची प्रतिक्रिया म्हणून या दंगली झाल्या. त्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले. त्यानंतर मोदी यांनी विकासाचा अजेंडा आणि प्रादेशिक भावना यांचे असे काही मिश्रण घडवले की, गेल्या दहा वर्षांपासून मोदी म्हणजे गुजरात असे समीकरण जमून गेले. काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली.

२००२ सालपासून भाजपाचे विरोधक गुजरात मधील त्या दंगलींचा सारखा उल्लेख करत असतात आणि मोदी यांना खुनी राजकारणी ठरवून त्यांची बदनामी करत असतात. दंगली फक्त गुजरातमध्येच झालेल्या आहेत की काय, असे वाटावे इतका हा मोदीविरोधी प्रचार सातत्याने सुरू असतो. या प्रचाराचा एक फायदा म्हणून काँग्रेसविषयी मुस्लीम समाजात सहानुभूती निर्माण होतही असेल. किंबहुना काँग्रेसचा तो सुरुवातीपासूनचा अजेंडाच आहे.

काँग्रेस पक्ष हिंदूंच्या विरोधात नाही. या पक्षाचे नेते हिंदूच आहेत. परंतु ते हिंदुत्ववादी नाहीत. त्यामुळे ते सातत्याने हिंदुत्ववादाचा विरोध करून मुस्लीम मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र हे करत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की, ते या प्रचारातून मोदी यांच्या विषयी हिंदू समाजात सहानुभूती निर्माण करत असतात. २००२ पूर्वीच्या सातत्याने होत असलेल्या जातीय दंगलींमुळे हिंदू समाज खूप त्रस्त झालेला होता आणि हा समाज मोदी यांच्याकडे आपला त्राता म्हणून पाहतो. त्यामुळे काँग्रेसचे लोक मोदी यांच्यावर जातीय भावनेतून जेवढी टीका करता तेवढा हिंदू समाज मोदींच्या मागे संघटित होतो.

कालच पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी जातीय दंगलींच्या मुद्यांवरून मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. गुजरात मध्ये मुस्लीम लोक सुरक्षित नाहीत, अशी बांग मनमोहनसिंग यांनी ठोकली. परंतु मनमोहनसिंग यांना सुद्धा मुस्लीम मते आकृष्ट करण्याचा हा हातखंडा वापरावासा वाटावा याचे सखेद आश्चर्य वाटते. त्यांचा हा कांगावा पूर्णपणे मतलबीपणाचा तर आहेच, परंतु आपल्या पायाखाली नेमके काय जळत आहे याकडे दुलर्क्ष करण्याच्या त्यांच्या मनोवृत्तीचा द्योतक आहे. भारतीय जनता पार्टी आणि दंगली यांची सांगड घालणारे मनमोहनसिंग एक गोष्ट विसरत आहेत की, २००२ साल पासून गुजरातमध्ये जातीय दंगली झालेल्या नाहीत.

२००२ सालचा कोळसा  पुन्हा पुन्हा उगळायचा असे त्यांनी ठरवले असले तरी गुजरातमध्ये मुस्लीम समाज असुरक्षित आहे असे एकही मुस्लीम नेता म्हणत नाही. त्यामुळे मनमोहनसिंग यांचे विधान सरसकट खोटारडेपणाचे आहे. सध्या जातीय दंगलींचा आणि मुस्लीम असुरक्षित असल्याचा डोळे उघडे ठेवून आढावा घेतला तर असे लक्षात येते की, मनमोहनसिग ज्या आसाम राज्यातून राज्यसभेवर निवडून आलेले आहेत त्या आसाममध्येच मुस्लीम समाज सर्वाधिक असुरक्षित आहे.

भरीस भर म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून अभूतपूर्व जातीय दंगली झालेल्या आसाममध्ये गेल्या २० वर्षांपासून काँग्रेसच्या हातातच सत्ता आहे. आसाममधल्या जातीय दंगली इतक्या भीषण आहेत की, त्या राज्याच्या केवळ खेड्यापाड्यापर्यंतच नव्हे तर वाड्या-वस्त्यांपर्यंत जाऊन पोचलेल्या आहेत. स्वतःचा अजेंडा फार सेक्युलर असल्याचा टेंभा मिरवणार्या् काँग्रेस पक्षाला आसाममधल्या दंगली ही एक मोठी थप्पडच आहे. पंतप्रधानांच्या या निवेदनावर नरेंद्र मोदी यांनी त्यांना चोख उत्तर दिले आहे आणि काँग्रेसच्या राज्यातच मुस्लीम अधिक असुरक्षित असल्याचे दाखवून दिले आहे.

गेल्या पाच वर्षातील भाजपा आणि काँग्रेसच्या राज्यांचा या संबंधात आढावा घेतला तर असे लक्षात येते की, भाजपाची सत्ता असलेल्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यात जातीय दंगली होत नाहीत. उलट ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे त्या महाराष्ट्र, आसाम, राजस्थान या राज्यात अधिक जातीय दंगली होत आहेत. महाराष्ट्रातल्या एका दैनिकाने गृहमंत्रालयाच्या अधिकार्यांतचा हवाला देऊन ही माहिती प्रकट केली आहे. महाराष्ट्र हे राज्य जातीय दंगलीत गुजरातपेक्षा आघाडीवर आहे. मात्र काँग्रेसचे नेते जातीय दंगलीवरून भाजपालाच बदनाम करत असतात.

Leave a Comment