वादळी अधिवेशन

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन नागपूरमध्ये होत असते. विदर्भ महाराष्ट्रात येत असताना नागपूर ही राज्याची उपराजधानी असेल असे आश्वासन देण्यात आले होते आणि ते आश्वासन पाळण्याचा एक उपाय म्हणून केवळ हे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा उपचार पाळला जातो. एवढे एक अधिवेशन वगळता उपराजधानी म्हणून नागपूरमध्ये काय होत असते हा संशोधनाचा विषय व्हावा. नागपूरचे अधिवेशन उपचार म्हणून भरवले जात असल्याने ते अल्पकाळ चालते आणि हिवाळा असल्यामुळे थंडही असते. ते सुरू होण्याच्या आधीच ते किती लवकर आटोपणार यावरच चर्चा सुरू होत असते.

मात्र या वर्षीचे हे हिवाळी अधिवेशन कमालीचे वादळी आणि गरमागरमीने भरलेले असेल अशी शक्यता आहे. कारण एकंदरीत राज्यामध्ये आणि सरकारच्या संबंधात अनेक वाद विषय याच काळात पुढे आलेले आहेत. विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवावा एवढे विषय एकदम पुढे येण्याची ही दुर्मिळ वेळ आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देऊन बाहेर पडले आणि सुमारे अडीच महिन्यात मंत्रिमंडळात परतही आले. विरोधकांनी पाण्याच्या प्रश्नावरून त्यांना त्रस्त केले होते, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप लावले होते. या आरोपांमुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही गुदगुल्या होत होत्या.

कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार चालवत असले तरी या दोन पक्षात आतल्याआत परस्परांवर कुरघोडी करण्याचे राजकारण चाललेले असते. त्यातच पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या अंगावर भ्रष्टाचाराचा एकही शिंतोडा उडू नये याबाबत कमालीची दक्षता घेतली आहे आणि त्या उलट उपमुख्यमंत्री मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपात गुंतत आहेत. हे बघून पृथ्वीराज चव्हाण यांना आपले खमीस अधिकच शुभ्र होत असल्याचे जाणवायला लागले आणि त्यांनी ते अधिक शुभ्र असल्याचे लोकांनाही दिसावे म्हणून अजित पवार यांच्यावर श्वेत पत्रिकेचे अस्त्र फेकून त्यांचा खमीस अधिक डागाळलेला करण्याचा डाव टाकला.

महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण यांची अवस्था केंद्रातल्या मनमोहनसिंग यांच्या प्रमाणेच झालेली आहे. ते स्वतः स्वच्छ असतात परंतु त्यांचे सहकारी मात्र भ्रष्ट असतात. त्यामुळे ते अडचणीत येतात. पृथ्वीराज चव्हाण यांच्या श्वेतपत्रिकेचे असेच झाले. हे अस्त्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या काही मंत्र्यांवरच उलटण्याची शक्यता दिसायला लागली. परिणामी त्यांना हे अस्त्र आपल्या हातानीच बोथट करून म्यान करावे लागले. त्यातून या दोन मित्र पक्षांमध्ये जी मॅच फिक्सिंग झाली तिच्यातून अजित पवार आत आले. परंतु सरकार आणि पवार दोघेही अडचणीत आले. सिंचन प्रकल्पांवर झालेल्या खर्चाचे फलित हा आता वादाचा विषय होणार आहे. कारण सरकार एका बाजूला खर्चाचा उपयोग झाल्याचे सांगत आहे तर दुसर्याि बाजूला राज्यातली जनता, शेतकरी आणि जनावरे  पाण्यासाठी त्रस्त झालेली आहेत.

तीव्र पाणी टंचाई, गंभीर दुष्काळ हे विषय विधानसभेत गाजणार, असे दिसत आहे. पाण्याचा विषय समोर आला की, अजित पवार यांचे नाव येणारच आणि त्यांच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख होणारच. त्यातूनच पवार यांना बोलू न देण्याचे धोरण विरोधकांनी आखले आहे. विधानसभेमध्ये भ्रष्ट मंत्र्यांचे विषय चांगलेच गाजणार आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रोज एक तोफ डागायचे ठरवले आहे. परंतु त्यामुळे छगन भुजबळ फार विचलित झालेले नाहीत. त्यांच्या मते या आरोपात काही तथ्य नाही. मात्र दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचे कंत्राट देताना झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात काही पुरावे समोर आलेले आहेत आणि त्यामुळे हा विषय विधानसभेत उपस्थित होणार असे दिसत आहे.

काँग्रेस पक्षामध्ये शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या कोळसा कांडाचा विषय फारसा चर्चेला येण्याची शक्यता दिसत नाही. कारण त्या संबंधातील कारवाई केंद्राकडून केली जात आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर पुढे आलेली असून त्यामध्ये चौकशा होऊन प्रकरणे न्यायालयापर्यंत गेलेली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी मंत्र्यांच्या विरोधात सदनात मोठा गोंधळ होण्याची शक्यता दिसत आहे. भुजबळ आणि अजित पवार यांच्या खालोखाल सुनील तटकरे यांना लक्ष्य केले गेलेले आहे. गुलाबराव देवकर यांना तर एकदा अटक सुद्धा झालेली आहे. त्यांच्या घरकुल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन यांच्यासह बाकीचे सगळे आरोपी तुरुंगात आहेत. केवळ तांत्रिक बाबीचा फायदा घेऊन देवकर सर्वोच्च न्यायालयातून जामिनावर सुटलेले आहेत.

डॉ. विजयकुमार गावित हेही आता एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उघडे पडलेले आहेत. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा विषयही सरकारपुढे डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. इंदू मीलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा वाद जास्त तापणार आहे.

Leave a Comment