केजरीवाल यांनी जाहीर केले अंबानींचे खाते क्रमांक

मुंबई दि.१०- अंबानी बंधूंचे जिनिव्हा येथील एचएसबीसी बँकेतील खाते नंबर देऊन आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी नवा बॉम्ब टाकला आहे. अंबानी बंधू आणि त्यांची आई कोकिलाबेन यांचे स्वीस बँकेत खाते असल्याचा आरोप यापूर्वी केजरीवाल यांनी केला होता मात्र अंबानी बंधूंनी त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला होता. या घटनेला कांही दिवस लोटताहेत तोच केजरीवाल यांनी अंबानी बंधूंच्या स्वीस बँक खात्याचे नंबर जाहीर केले आहेत आणि दोन्ही बंधूंच्या खात्यात सध्या १ अब्ज डॉलर्स रक्कम असल्याचे तर कोकिलाबेन यांच्या खात्यात शून्य रक्कम असल्याचेही जाहीर केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या लिटररी कार्निव्हल मध्ये केजरीवाल बोलत होते.

केजरीवाल म्हणाले की एचएसबीसीच्या जिनिव्हा शाखेत ५०९०१६०९८३ ,९८४ अशी अंबानी बंधूंची खाती आहेत. आयकर विभागाकडे अशा सातशे खात्यांची माहिती आहे. मात्र बड्या माशांना दुखवायचे नाही या धोरणाने त्यावर कांहीच कारवाई केली जात नाही. केजरीवाल यांचे सहकारी प्रशांत भूषण यांनीही ही बँक हवाला रॅकेट चालवत असल्याचा आरोप यापूर्वीच केला होता. अंबानी यांच्याबरोबरच डाबरचे बर्मन, जेट एअरवेजचे गोयल, बिर्ला यांचीही खाती येथे असून अंबानी बंधू आणि काँग्रेसचे खासदार अन्नू टंडन याच्या खात्यातून विशेष व्यवहार मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत असेही केजरीवाल म्हणाले.