पोरखेळ

महाराष्ट्राचे माजी उपमुख्य मंत्री अजित पवार यांचा राजीनामा आणि तीनच महिन्यामध्ये त्यांनी पुन्हा मंत्रिमंडळात परत येणे या घटनचे वर्णन एका शब्दात करायचे झाले तर पोरखेळ या शब्दात करावे लागेल. त्यांनी राजीनामा दिला, नंतर कथित श्वेतपत्रिका बाहेर पडली. ती बाहेर पडल्यानंतर श्वेतपत्रिका म्हणजे भ्रष्टाचाराची चौकशी नव्हे असे मुख्यमंत्र्यांनीही म्हटले आणि स्वतःही अजित पवार यांनीसुध्दा तसेच म्हटले.

परंतु जी श्वेतपत्रिका चौकशीसाठी नव्हती तिने आपल्याला क्लिन चीट दिली आहे असे म्हणत अजितदादा पुन्हा खुर्चीवर बसले आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यांना उपमुख्यमंत्री केले. मग ती श्वेतपत्रिका म्हणजे चौकशी नव्हती तर तिने अजितदादांना क्लिन चीट कशी दिली? अशा प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणातून असे राजीनामे आणि पुनरागमन घडत आहे. मात्र हे सारे प्रकार एकमेकांवर मात करण्यासाठी चालले आहेत असे स्पष्ट न बोलता ही मंडळी निरनिराळ्या
प्रकारचे युक्तिवाद करत आहेत आणि त्यातून त्यांचा पोरकटपणा अधिकच स्पष्ट होत आहे.

अजितदादा राजीनामा दिला तेव्हा असेच असंबध्द बोलत होते आणि आता पुन्हा पदावर आल्यावर सुध्दा त्यांची बोलण्याची पध्दत तीच राहिलेली आहे. त्याबोलण्यात काही तर्कशुध्दताही नाही आणि परिपक्वता तर काडीचीही नाही.  त्यांनी पूर्वी केलेल्या आणि आताही केलेल्या सगळ्या विधानांची जंत्री करून त्यांची चिरफाड करायची झाली तर त्यातून एक ग्रंथ निर्माण होईल. मात्र त्यात आपला वेळ वाया जाईल म्हणून या राजीनामा आणि पुनरागमन प्रकरणात केवळ जनतेची फसवणूक कोठे झाली आहे यावरच आपण विचार करणार आहोत. 

अजित पवार यांनी जवळपास तीन महिन्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात प्रवेश केला आहे. हे तीन महिने मंत्रिपदाच्या दगदगीपासून दूर राहिल्यामुळे त्यांच्या शरीराला विश्रांती मिळाली. परंतु  मनाने ते स्वस्थ नव्हते. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामाला वाहून घेण्याची शपथ घेतली होती आणि त्या दृष्टीने ते फिरत होते. त्यांनी पक्षाची खरोखर काय बांधणी केली आणि कोणते संघटनात्मक कार्य केले हे त्यांचे त्यांनाच माहीत. पण तीन महिन्याच्या या संघटनात्मक कामाचा भार सोडून  त्यांनी पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन केले आहे.

संघटनात्मक काम करणे हे मोठे अवघड असते. ते करताना लाल दिव्याची गाडी मिळत नाही, फुकट रेस्ट हाऊस मिळत नाही, खाण्या-पिण्याची व्यवस्था सरकारी अधिकारी करत नाहीत, शिवाय सनदी अधिकारी यस् सर म्हणून समोर उभे रहात नाहीत, रुबाब नसतो, घोषणा करता येत नाहीत, उन्हा-तान्हात फिरावे लागते, राजकारणात ईझी सक्सेस मिळालेल्या राजपुत्रांना ही उन्हा-तान्हातली वणवण सहन होत नसते. काँग्रेसचे नेते सत्तेविना जगूच शकत नाहीत. पाण्याबाहेर काढलेला मासा पाण्याशिवाय तडफड करतो तसे हे नेते सत्तेपासून दूर राहिल्यानंतर तडफड करायला लागतात आणि नाना प्रकारच्या लांड्या-लबाड्या करून पुन्हा खुर्ची कशी प्राप्त करता येईल यासाठी धडपड करायला लागतात.

अजित पवार यांचे नेमके असेच झालेले आहे. त्यांनी राजीनामा नेमका कशासाठी दिला होता हे त्यांचे त्यांनाच माहीत. राजीनाम्यामागचे नेमके कारण काय, याचा कसलाही खुलासा त्यांनी कधीच केलेला नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा का दिला आणि दिला ते योग्यच केले असे शरद पवार यांनी का म्हटले, हे कधीही स्पष्ट झालेले नाही. मग राजीनामा का दिला हेच माहीत नाही तर ते पुन्हा मंत्रिमंडळात का आले हे तरी कसे कळणार आहे? साधारणपणे श्री. अजित पवार यांनी, त्यांच्या समर्थकांनी, श्री. शरद पवार यांनी जी विधाने केली आणि राजीनाम्यापासून पुन्हा मंत्री होईपर्यंत ज्या घटना घडल्या त्या सगळ्या एकत्र जोडून पाहिल्या तर अजित पवार यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा दिला होता, असे अस्पष्टपणे तरी जाणवते.

सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचा हात आहे असे कोणीच म्हटले नव्हते. त्यांचा राजीनामासुध्दा कोणी मागितला नव्हता. आपला सिंचन घोटाळ्यात हात असल्याचा आरोप होत असल्याच्या निषेधार्थ आपण राजीनामा देत आहोत, असेही दादांनी कधीही म्हटलेले नव्हते. या गोष्टीला काही फार दिवस झालेले नाहीत. अजूनही आपण दोन-अडीच महिन्यांपूर्वीची सगळी वृत्तपत्रे काढून वाचू शकतो. एकंदरीत कसल्याही आरोपाविना त्यांनी राजीनामा दिला होता. परंतु त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेताना मात्र, कसलेही आरोप सिद्ध झाले नाहीत म्हणून त्यांना आत घेतले जात आहे असे सांगितले गेले आहे. जगाच्या इतिहासातली ही एक अभूतपूर्व घटना आहे. आरोपच झालेले नाहीत, परंतु नंतर मात्र आरोपातून सुटका झाल्याचे जाहीर केले जात आहे. आरोप न होताच क्लिन चीट दिली जात आहे आणि या आरोपाविना क्लिन चीटचा उपयोग करून अजित दादा पुन्हा एकदा घोटाळे करण्यासाठी मंत्रिमंडळात प्रविष्ट झाले आहेत.

Leave a Comment