चंद्रावर विसरलेल्या कॅमेऱ्याची आठवण

चंद्रावर पहिले मानवी पाऊल उठविणारे नील आर्मस्टाँग यांचे नांव सर्वांनाच माहिती आहे. मात्र चंद्रावर शेवटचे पाऊल कुणाचे होते याची माहिती लोकांना फारशी नाही. चंद्रमोहिमेतील शेवटची मोहिम असलेल्या अपोलो १७ यानाचे कमांडर युजेन सेरनन यांच्याकडे चंद्रावर उतरलेला शेवटचा अंतराळवीर असल्याचा मान आहे. युजेन या मोहिमेच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त या मोहिमेतील आठवणींना उजाळा देत होते.

युजेन यांनी त्यांचा कॅमेरा ४० वर्षांपूर्वी चंद्रावर सोडला होता मात्र तो या अपेक्षेतून की भविष्यात चंद्रावर जाणारे अंतराळवीर तो परत आणतील. मात्र त्यांच्यानंतर अजून कोणीच चंद्रावर गेलेले नाही. या घटनेलाही आता ४० वर्षे लोटली आहेत. अपोलो १७ नंतरही तीन चांद्रमोहिमा आखल्या गेल्या होत्या पण पैशांअभावी त्या प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. युजेन सांगतात त्यांनी परतताना त्यांचा कॅमेरा वजन जास्त होऊ नये म्हणून चंद्रावर सोडला. मात्र त्याची लेन्स त्यांनी क्षितिजाच्या दिशेने रोखून ठेवली. हेतू हा की सूर्याच्या रेडिएशनच्या या काचेवर काय काय परिणाम झाला तो समजावा. आपल्यानंतरही कोणीतरी चंद्रावर उतरेल तेव्हा ही निरीक्षणे उपयोगाची ठरतील असे त्यांना वाटत होते.

युजेन सांगतात की माझ्या पावलांनंतर चंद्रावर अन्य कुणा मानवाची पाऊले उठली नाहीत याचे मला दुःख होते आहे. मी मोहिमेवर निघताना माझा प्रवास शेवटचा ठरेल असे तेव्हा मला वाटले नव्हते. आता या शतकाअखेरी मंगळावर माणूस जाईल. चंद्रावर कोण कधी जाईल हे आत्ताच सांगता येत नाही. त्यामुळे माझा कॅमेरा मी परत आणायला हवा होता अशी भावनाही ७८ वर्षीय युजेन यांनी व्यक्त केली.