आंध्रातील केजी डीजी गॅसफिल्डमधील क्षेत्राची विकास योजना जाहीर केली नाही आणि करारापेक्षा कमी वायू उत्पादन केले तसेच मान्यता मिळालेल्या विहिरी खोदल्या नाहीत या कारणावरून रिलायन्सला १ अब्ज डॉलर्सचा दंड केला गेला असल्याचे तेलमंत्री वीरप्पा मोईली यांनी जाहीर केले आहे. अर्थात हा दंड म्हणजे या कामापोटी रिलायन्सला देण्यात येणारा खर्च आता दिला जाणार नाही असे समजते.
रिलायन्सने हस्तगत केलेल्या क्षेत्रातून या वर्षात दररोज २९.८१ दशलक्ष क्युबिक मीटर वायू उत्पादन करारानुसार करावयाचे होते मात्र हे उत्पादन खूपच कमी केले गेले आहे. ऑगस्ट २०१० पासून केवळ ६२ दशलक्ष क्युबिक मीटर उत्पादनच झाले आहे. अधिक उत्पादनासाठी आवश्यक असलेले ड्रीलिंग रिलायन्सने केलेलेच नाही. डी१- डी ३ या क्षेत्रात ३१ विहीरी कराराप्रमाणे खोदणे आवश्यक असताना रिलायन्सने केवळ २२ विहीरी खोदल्या असून त्यातील १८ विहीरीतूनच उत्पादन होत आहे असेही सांगण्यात आले.
या वर्षात डी१- डी ३ क्षेत्रातून ८० दशलक्ष क्युबिक मीटर वायू उत्पादन होणे अपेक्षित असताना आक्टोबरपर्यंत केवळ २३.९४ दशलक्ष क्युबिक मीटर वायू उत्पादन केले गेले आहे असेही समजते. या सर्व कारणांमुळे रिलायन्सला वरील दंड केला गेला आहे.