भाजपाकडून एकही मुस्लीम उमेदवार नाही

अहमदाबाद दि. २९ – गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील मुस्लीमांबरोबर सलोख्याचे संबंध स्थापित करण्यात यश मिळविल्याचे सांगितले जात असले तरी आगामी विधानसभा निवडणूकांत भाजपने एकाही मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिलेले नाही. मुस्लीम उमेदवाराला तिकीट देणे म्हणजे भाजपातून फूटून बाहेर पडलेल्या आणि नवा पक्ष स्थापन केलेल्या केशुभाई पटेल यांच्या विजयाला मार्ग सुकर करणे आहे असे मतही या संदर्भात भाजपचे नेते व्यक्त करत आहेत. अर्थात केशुभाईंनीही अद्याप एकही मुस्लीम उमेदवार जाहीर केलेला नाही.

भाजपचे प्रवक्ते विजय रूपानी यांनी यासंदर्भात बोलताना भाजपचा तुष्टीकरणाच्या राजकारणावर विश्वास नसल्याचे सांगितले असले तरी तिकीटे दिलेल्या उमेदवारांत ७५ टक्के उमेदवार रिपीट आहेत. मुस्लीम उमेवारांना तिकीट दिले तर भाजपापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि विहींपचे मतदार दुरावतील असेही सांगितले जात आहे. मुस्लीम संघटनेचे नेते सय्यद शहाबुद्दीन यांनी मोदी यांना खुले पत्र लिहून मुस्लीम उमेदवारांना वीस जागा द्याव्यात असे आवाहन केले होते मात्र त्यावर कांहीही कारवाई झालेली नाही असे दिसून आले आहे. निदान भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे महेबुबअली यांना तरी सुरत मधून तिकीट मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली गेली होती मात्र त्यांनाही तिकीट दिले गेलेले नाही.

अन्य पक्षांत काँग्रेसने चार, समाजवादीने १७, बसपाने पहिल्या यादीत ८, जनता दलाने १, पास्वान यांच्या लोकतांत्रिक दलाने १२ मुस्लीम उमेदवारांना तिकीटे दिली असून ३ मुस्लीमांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत.

Leave a Comment