काँग्रेसचा ‘कॅश ट्रान्स्फर गेम’: भाजप

नवी दिल्ली:लाभार्थीना अनुदानाच्या रकमा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची केंद्र सरकारची योजना हा आगामी काळातील सर्वात मोठा घोटाळा ठरणार असून ही काँग्रेसने राजकीय लाभ उठविण्यासाठी खेळलेली चलाख खेळी आहे; असा आरोप भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे.

निवृत्तीवेतनासह इतर अनुदानाच्या रकमा लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकारने आखलेल्या या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नुकतीच केली असून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ही योजना दि. १ जानेवारी २०१३ पासून कार्यान्वित करण्याची ग्वाही दिली आहे. अनुदान वाटपातील संभाव्य भ्रष्टाचार आणि विलंब तळून ही प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी ही योजना उपयुक्त असल्याचा दावा सरकार करीत आहे.

भाजपने मात्र ही योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे नवे कुरण असल्याचा आरोप केला आहे. आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसने ही योजना आणली असून या योजनेमध्ये सर्वसामान्य जनतेला नव्हे तर केवळ कॉंग्रेसच्या लोकांना पैसे वाटण्याची सोय सरकारने करून ठेवली आहे; असा आरोप नक्वी यांनी केला. ही योजना म्हणजे काँग्रेस कॅश ट्रान्स्फर गेम आहे; अशा शब्दात त्यांनी या योजनेची खिल्ली उडविली.

Leave a Comment