४२ लाख डॉलर्सची ख्रिसमस ट्री

टोकियो दि.२३ – डिसेंबर महिना सुरू होताच जगभरात वेध लागतात ते ख्रिसमस किंवा नाताळचे. ख्रिश्चन बांधवांसाठी हा सण महत्त्वाचा असतो आणि त्यानिमित्ताने घराघरात आपल्या गुढीसारखी ख्रिसमस ट्री त्यावर विविध भेटवस्तूंसह सजवली जाते. जपानमधील सराफ व्यावसायिकाने यंदा चक्क शुद्ध सोन्याचीच ख्रिसमस ट्री विक्रीसाठी बनविली असून त्यासाठी तब्बल ४० किलो सोने वापरले गेले आहे. सुमारे सात फूट उंचीच्या या ट्री वर डिस्नेच्या गोष्टीतली लोकप्रिय ५० व्यक्तीचित्रे सोन्यातच बनवून लटकविण्यात आली आहेत. याची किंमत आहे फक्त ३५० दशलक्ष येन किवा ४२ लाख डॉलर्स.

याविषयी माहिती देताना तोकोमो इशिबाशी या सराफी व्यवसायील महिला सांगते, सध्या जपानमध्ये सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ४४०० येन आहे. या ट्री वर लावण्यात  आलेली डीस्ने व्यक्तीचित्रे कुशल कारागिरांनी हातांनी बनविली आहेत. त्यासाठी १० कारागीर सतत दोन महिने काम करत होते. यात डोनाल्ड डक, मिकी माऊस आहे तसेच सिंड्रेलाचाही समावेश आहे. हे ट्री इतके गोजिरवाणे दिसते आहे की येणारा ग्राहक त्याकडे मुग्ध होऊन पाहात राहतो. अर्थात त्याची किंमतही तशीच जबरदस्त आहे म्हणून याचीच छोटी प्रतिकृतीही बनविली गेली आहे. त्यावर २० डिस्ने कॅरेक्टर्स असून ट्री ची उंची २५ सेंमी आहे. याची किंमत २ लाख येन असून या ट्री ला ग्राहक मिळाला आहे.