अल्ला मैने गलती की

भारतीय न्याय व्यवस्था इतकी परिपूर्ण आहे की या व्यवस्थेतून ज्याला शिक्षा होत असते तो नक्कीच अपराधी आहे याची अनेक अंगांनी पुराव्यानिशी खातरजमा केली गेलेली असते. अजमल कसाब याने न्यायालयात  त्याच्यावर खटला सुरू असताना अनेकदा निरपराध असल्याचे नाटक केले पण शेवटी तो अपराधी आहे हे सिद्ध झाले. त्याची शिक्षा म्हणून त्याला फासावर चढवण्याची वेळ आली तेव्हा त्याने अल्ला जवळ आपला अपराध कबूल केला आणि अल्लाची क्षमा मागितली. त्याच्या अंतरात्म्याला आपण गुन्हेगार आहोत याची खात्री होती. अर्थात माणूस शेवटी देवाजवळ तरी खरे बोलतो.

पण आता त्याला माफ करायला अल्ला येणार नव्हता. त्याच्या शिक्षेचा अंमल माणसेच करणार होती. एकंदरीत त्याला आपल्या कृत्याची जाणीव झाली. अशा वेळी अशा लोकांना देवाच्या पाठोपाठ आई आठवते. अजबला कसाबलाही आई आठवली. तिच्या पोटी जन्माला  येऊन आपण तिला काय सुख दिले असा प्रश्न त्याच्या मनाला सतावत असणारच. कारण आज अनेक वृत्तपत्रांनी त्याच्या आईचीही मनस्थिती जाणून घेऊन ती जगासमोर ठेवली आहे. ती मनस्थिती या क्रूर कर्म्याला जाणवत असणारच. आपण धर्मवेडेपणाच्या आहारी जाऊ फासावर चढून मरण पावलो आणि सुटलो पण आपल्या पश्चात आपली आई किती मरणं मरणार आहे हे त्याच्या लक्षात आले असणार.    

कसाबच्या गावात, देशात  या फाशीची प्रतिक्रिया कशी उमटली याबाबतही भारतातल्या अनेक लोकांना जाणून घ्यायला आवडेल. कारण ही फाशी तिथल्या लोकांसाठीही अनपेक्षित आणि धक्कादायक होती. कसाबची फाशी सर्वोच्च न्यायालयात कायम झाली आणि आता ती अटळ आहे असे ठरल्यावर हे सरकार कसाबला कधी तरी फासावर चढवणार हे नक्कीच होते आणि पाकिस्तानातही याबाबत उत्कंठा होती पण कसाबची फाशी एवढ्या झटपट अंमलात आणली जाईल अशी त्यांना अपेक्षा नव्हती. अफझल गुरूची फाशी सात वर्षांपासून स्थगित आहे. ती आधी अंमलात येईल आणि नंतर सावकाश बराच वाद होऊन कसाबला फासावर चढवले जाईल अशी केवळ पाकिस्तानी जनतेचीच नाही तर सार्यास जगातल्याच लोकांची कल्पना होती.

पण महाराष्ट्र शासनाने तडकाफडकी कारवाई करून अतीशय गोपनीयता पाळून कसाबला फासावर लटकावले. काही वेळा आपल्या अशा योजना राबवताना एवढा सावळा गोंधळ असतो की आपण  असे निर्णय राबवण्याच्या लायकीचे आहोत की नाही अशी शंका येते. पण या कामात आपल्या गृह खात्याने आणि पोलीस अधिकार्यां नी स्पृहणीय काम केले आहे. गृहमंत्री आराराबा यांना यावेळी म्हणावेसे वाटते की, आबा कधी कधी असे चांगलेही काम करीत जा ना !’ 

आपल्या देशाने  अशा प्रकारची गोपनीयता पोखरणच्या वाळवंटात करण्यात आलेल्या अणुचाचण्यांच्या वेळीच पाळली होती. ती गोपनीयता तर फारच कौतुकास्पद हाती कारण आपल्या या संबंधातल्या हालचालींवर अवकाशातून अमेरिकेच्या विलक्षण तीक्ष्ण नजरेच्या आणि हेरगिरी करणार्या् उपग्रहांचे लक्ष होते. त्यालाही आपण चकवले होते. त्या कामात पोखरणच्या परिसरातल्या ग्रामस्थांना आता काही तरी घडणार आहे याची कल्पना आली होती पण त्यांनीही मौन पाळले. अजमल कसाबच्या फाशीच्या बाबतीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ज्या तडफेने काम केले आणि कसाबचा अर्ज फेटाळून लावला त्या तडफेने प्रतिभा पाटील यांनीही अफझ्रल गुरूचा अर्ज  का फेटाळून लावला नाही असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. त्यांनीही दयेच्या अर्जाचा असाच त्वरेने निर्णय दिला असता तर अफझल गुरू २००७ सालीच फासावर गेला असता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याचाही अर्ज  निकाली काढून त्याच्या मृत्यूदंडाचा मार्ग मोकळा करावा.

अजमला कसाबला फाशीने झालेल्या  अपेक्षाभंगामुळे पाकिस्तान सरकारला आपली प्रतिक्रियाही नीट ठरवता आली नाही. या घटनेबद्दल आनंद व्यक्त करावा, दुःख व्यक्त करावे की मौन पाळावे हे तिथल्या सरकारी प्रवक्त्यांना कळेना त्यामुळे, ‘पाकिस्तान हा देश नेहमीच दहशतवादाच्या विरोधात लढत आला आहे,’ अशी गोलमाल प्रतिक्रिया सरकारने व्यक्त केली. अर्थात, पाकिस्तान सरकारला आपण दहशतवादाच्या विरोधात आहोत हे सोंग वठवायचेच असल्यामुळे कसाबच्या फाशीबद्दल खेद वगैरे काही व्यक्त करता आला नाही. मात्र सरकारने काही वेगळ्या पध्दतीने आपले सत्य स्वरूप प्रकट केलेच.

कसाबच्या फाशीची बातमी समजताच पाकिस्तानातले पत्रकार कसाबच्या मुळ गावाकडे म्हणजे फरीदाबादकडे धावले आणि तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया नोंदवायला लागले. पण आयएसआय या संघटनेने काही सुरक्षा सैनिकांना साध्या वेशात या गावात पाठविले होते. या सैनिकांनी आपण या गावचे नागरिक आहोत अशी बतावणी केली आणि पत्रकारांना रोखले. त्यांचे कॅमेरे हिसकावून घेतले. आपण नेहमीच दहशतवाद्यांच्या विरोधात असतो हा पाकिस्तान सरकारचा दावा किती पोकळ आहे हे सिद्ध करायला आणखी कोणता पुरावा हवा आहे ?

Leave a Comment