सोने खरेदीसाठी कर्ज नको- रिझर्व्ह बँक

मुंबई दि.२०- देशातील कोणत्याही बँकेने आपल्या ग्राहकांना कोणत्याही स्वरूपातील सोने खरेदीसाठी कर्ज देऊ नये असे आदेश रिझर्व्ह बँकेने सोमवारी जारी केले आहेत. या आदेशानुसार बँकांना सोने नाणी, दागिने, इटीएफ, सोन्यात गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड, शेअर, प्रायमरी सोने अशा सोन्याच्या कुठल्याही प्रकारातील खरेदीसाठी ग्राहकांना कर्ज देता येणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या ३० आक्टोबरच्या धोरणानुसार हा आदेश काढण्यात आला असल्याचे समजते.

गेली कांही वर्षे भारतातील सोने आयात लक्षणीयरित्या वाढत चालली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार व ग्राहक देश आहे. गेल्या वर्षात सोन्याचे दर १० टक्कयांनी वाढूनही सोने खरेदीत जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात तब्बल २७ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. बँका सोने खरेदीसाठी कर्ज देत असल्याने सोने खरेदी वाढत चालली आहे आणि त्याचा थेट परिणाम देशाच्या व्यवसाय संतुलनावर होत असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे हा आदेश जारी करण्यात आला आहे असे सांगितले जात आहे. मात्र ग्राहकांना कर्ज देता येणार नसले तरी बँका सराफ व्यावसायिकांना त्यांच्या वर्कींग कॅपिटलची गरज असेल त्यानुसार कर्ज देऊ शकणार आहेत असे बॅकांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.