शिवसेना मनसे हातमिळवणी दूरची बात

मुंबई दि. २० – सेनेतून बाहेर पडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केलेले राज ठाकरे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सेना प्रमुखांच्या निधनानंतर एकत्र येणार का याची चर्चा राज्यभर जोरात सुरू असली तरी हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणे ही दूरची बात असल्याचे दोन्ही पक्षांतील वरीष्ठ सांगत आहेत.

सेना प्रमुखांच्या अंत्ययात्रेत राज ट्रकवर नसणे, सेना भवनात न जाणे याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेतच पण अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेबांच्या निधनानंतर दुसरे दिवशी अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जमलेल्या सुमारे १ हजार मनसे कार्यकर्त्यांना  अंत्ययात्रेत सामील होण्यापासून थांबविले गेले होते असे समजते. स्वतः राज ही अंत्ययात्रेत पायी चालत आले आणि मध्येच घरी गेले याचीही संगती या घटनेशी लावली जात आहे.

राज यांना स्वतःची महत्त्वाकांक्षा आहे त्यामुळे ते सेनेत येणार नाहीत असे शिवसेना नेते सांगत आहेत. मनसे आपला मराठी माणूस हाच मुद्दा धरून राजकारण करणार आहे तर सेना हिंदुत्वाचा मुद्दाच कायम ठेवणार आहे असेही हे नेते सांगत आहेत. सेना प्रमुखांचा अस्थिकलश आणण्यासाठीही राज उद्धव बरोबर गेले नव्हते ही बाबही ठळकपणे समोर आणली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षातील बंधू राजकारणात विरोधक म्हणूनच राहतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Leave a Comment